Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरमध्ये हायड्रॉमा: वाहतूक पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यात राडा; लोकप्रतिनिधींच्या आक्रमक पवित्र्यानंतर वाद मिटला

 महाबळेश्वरमध्ये हायड्रॉमा: वाहतूक पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यात राडा; लोकप्रतिनिधींच्या आक्रमक पवित्र्यानंतर वाद मिटला

​महाबळेश्वर:


पर्यटनाचा पीक सीजन आणि वीकेंडच्या गर्दीमुळे महाबळेश्वरमध्ये सध्या पर्यटकांचा महापूर आला आहे. मात्र, याच गर्दीचा ताण शुक्रवारी प्रशासकीय यंत्रणेवर दिसून आला. वेण्णा लेक परिसरात वाहतूक पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यामध्ये झालेल्या जोरदार वादामुळे पर्यटनस्थळावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर नगराध्यक्षांसह लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनंतर या वादावर पडदा पडला.

​शुक्रवारी वेण्णा लेक परिसरात पर्यटकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस आणि पालिका प्रशासन रस्त्यावर उतरले होते. मात्र, या प्रचंड गोंधळात वाहतूक नियोजन करताना पोलीस आणि वेण्णा लेक टोल नाक्यावरील पालिका कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला.

वाहतूक नियंत्रणा प्रसंगी वाहतूक पोलीस व पालिका कर्मचारी यांचावाद इतका टोकाला गेला की, एका वाहतूक पोलिसाने पालिका कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली या प्रकारामुळे घटनास्थळावरील इतर कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.


​कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच महाबळेश्वरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी नगरसेवकांसह थेट वेण्णा लेक टोल नाका गाठला.

​नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि नगरसेवकांनी पोलीस प्रशासनाचा तीव्र निषेध केला.

​संतप्त लोकप्रतिनिधींनी पोलीस निरीक्षकांना घेराव घालून संबंधित पोलिसावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

​ या हायड्रॉमामुळे वेण्णा लेक परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे कोलमडली, ज्याचा फटका पर्यटकांना सहन करावा लागला.


​परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. दोन्ही बाजूंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चर्चा झाली. संबंधित वाहतूक कर्मचाऱ्याने आपल्या वर्तनाबद्दल दिलगिरी (माफी) व्यक्त केली. माफीनामा समोर आल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी मवाळ भूमिका घेत वाद संपवण्याचा निर्णय घेतला.

​या आंदोलनात आणि वाद मिटवण्याच्या प्रक्रियेत नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्यासह नगरसेवक अफजल सुतार, संतोष आबा शिंदे, रोहित ढेबे, मुख्याधिकारी योगेश पाटील, मुख्यलिपिक बबनराव जाधव, अक्षय वायदंडे, शिवसेना शहरप्रमुख राजा गुजर, आकाश साळुंखे, शंकर ढेबे, शहानवाज खारखंडे यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक व विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 यंत्रणांमध्ये समन्वयाची गरज

​ही घटना तूर्तास मिटली असली, तरी महाबळेश्वरसारख्या आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळावर पोलीस आणि पालिकेमध्ये असा वाद होणे दुर्दैवी आहे. भविष्यात पर्यटकांची गर्दी पाहता सर्व यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवून काम करावे, जेणेकरून शहराची प्रतिमा डागाळणार नाही, अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.