Type Here to Get Search Results !

महाबळेश्वर येथे भव्य किल्ले स्पर्धा आयोजन............

महाबळेश्वर येथे भव्य किल्ले स्पर्धा आयोजन............                  रियाज मुजावर
महाबळेश्वर - महाबळेश्वर मधील शालेय विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने नाट्य शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून व प्रथमच नगरपरिषदेच्या सहकार्यातून येथील पेटीट लायब्ररीच्या मैदानावर भव्य किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक योगेश पाटील यांच्या सहकार्यातून करण्यात आले असून महाबळेश्वर पालिकेने स्पर्धेसाठी आवश्यक दगड, माती आणि इतर साहित्य पुरवले आहे.

या किल्ला स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची ओळख व त्यांचा ऐतिहासिक महत्त्व समजावून देणे हा आहे. किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये शालेय गट, सार्वजनिक मंडळे आणि वैयक्तिक गट सहभागी होऊ शकतील. नाट्य शिवप्रतिष्ठान गेल्या दहा वर्षांपासून ही परंपरा सुरू ठेवत आहे, मात्र कोरोनाच्या काळामुळे बाधित झालेली परंपरा आता पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. "छत्रपती शिवरायांना दुर्ग रूपी मानवंदना देण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा," असे आवाहन मुख्याधिकारी योगेश पाटील व नाट्य शिवप्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाट्य शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष किसनराव खामकर, उपाध्यक्ष प्रभाकर देवकर, कार्याध्यक्ष राजेश कुंभारदरे व सर्व टिम तसेच पालिकेचे मुख्य लिपिक आबाजी ढोबळे, वैभव साळुंखे, मुरलीधर धायगुडे परिश्रम घेत आहेत. तसेच शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, व्यापारी व लोकप्रतिनिधी यांचे देखील मोलाचे सहकार्य मिळत आहे. किल्ला स्पर्धेत विजेत्यांना आर्थिक बक्षिसांसोबत सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यास ११,००० रुपये, द्वितीय क्रमांकाला ७,००० रुपये, तृतीय क्रमांकाला ५,००० रुपये आणि  उत्तेजनार्थ १,००० रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी जागरूकता वाढवण्यास तसेच महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची स्मृती जपण्यास महत्त्वाची ठरणार आहे. महाबळेश्वर शहर आणि तालुक्याच्या सांस्कृतिक-ऐतिहासीक वारस्याला ही स्पर्धा चालना देईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.