गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, महाबळेश्वर येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चे वार्षिक स्नेहसंमेलन विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांनी तसेच विद्यार्थ्यांच्या सहभागाने अत्यंत उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने हे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
स्नेहसंमेलनाची सुरुवात स्काऊट-गाईड मेळाव्याने करण्यात आली. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सांघिक तंबू सजावटीतून आपली कल्पकता, शिस्त व संघभावना प्रभावीपणे सादर केली. याच अनुषंगाने प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दिनांक ५ व ६ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कबड्डी, रस्सीखेच, १०० मीटर धावणे, दोरी उडी, रिले व गोळा फेक अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना चालना मिळाली असून खेळाडूवृत्ती, शिस्त व संघभावना विकसित होण्यास मदत होणार आहे.
दिनांक ७ जानेवारी रोजी रांगोळी, चित्रकला, विज्ञान, कार्यानुभव, रिटेल व मल्टी-स्किल या विषयांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमाशी निगडित उपयुक्त, नाविन्यपूर्ण व कौशल्याधारित प्रकल्प सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
दिनांक ८ जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध पारंपरिक नृत्य, गीत व लोककलांनी सजलेल्या महाराष्ट्राच्या लोकधारेने कार्यक्रमाने विशेष रंगत आणली. या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला.
दिनांक ९ जानेवारी रोजी पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभासाठी गिरिस्थान नगरपरिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील, नगरसेवक ॲड. संजय जंगम, रोहित ढेबे, संतोष आखाडे, विमल पार्टे, पल्लवी कोंढाळकर, प्रियांका वायदंडे, विमल बिरामणे, कामगार संघटनेचे ऋषिकेश वायदंडे, माजी विद्यार्थी शंकर ढेबे तसेच पत्रकार अभिजीत खुरासने आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे व प्रशालेतील उपक्रमांचे कौतुक केले तसेच भविष्यात प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधा नगरपरिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन दिले.
अनेक वर्षांच्या खंडानंतर यावर्षी प्रशालेचे प्राचार्य परमेश्वर माने यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलनाचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाची स्नेहभोजनाने स्नेहसंमेलनाची सांगता झाली.
बातम्या व जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक : राहुल शेलार
मो.नं : 9765576377
कार्यकारी संपादक : रियाज मुजावर
मो.नं : 9403546485



Social Plugin