Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर मध्ये सी सी टीव्हीचे जाळे विस्कळीत; सुशोभीकरणाच्या कामात सुरक्षेकडे दुर्लक्ष .

 महाबळेश्वर मध्ये सी सी टीव्हीचे जाळे विस्कळीत; सुशोभीकरणाच्या कामात सुरक्षेकडे दुर्लक्ष .


महाबळेश्वर टाईम्स : संदेश भिसे 

महाबळेश्वर ( प्रतिनिधी )




महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळख असलेल्या तसेच देश-विदेशातील पर्यटकांचे आवडते  पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वर शहरात सध्या सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था विस्कळीत झाल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.तालुक्याचे ठिकाण असल्याने महाबळेश्वर शहरात दररोज पर्यटकांसह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरातील बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाषचंद्र बोस चौक या भागांचे सुशोभीकरण सुरू आहे.



      पहिल्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दिनेश मेडिकलपर्यंतचे काम अर्धवट अवस्थेत असून त्यापुढील दिनेश मेडिकल ते पोलीस स्टेशनपर्यंतचा टप्पा सध्या सुरू आहे. या कामा दरम्यान लाईटच्या तारा तसेच  इंटरनेट  केबल्स अंडरग्राऊंड करण्यात आल्या. मात्र, याच वेळी या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणांच्या केबल्स काढून टाकण्यात आल्या असून त्या पुन्हा बसवण्याकडे संबंधित विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसून येत  आहे.


या बाबत वारंवार लक्ष वेधूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने शहरातील सीसीटीव्हीचे  जाळे विस्कळीत झाले आहे.



         महाबळेश्वर हे संवेदनशील पर्यटनस्थळ असल्याने मुख्य बाजारपेठ व चौकांमध्ये पर्यटक व स्थानिकांची मोठी गर्दी असते. सुशोभीकरणाच्या आधी शहारा मध्ये महाबळेश्वर नगरपरिषदेच्या मार्फत  महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही  बसविण्यात आले होते यामुळे नगरपरिषद व पोलीस प्रशासनाची करडी नजर या भागात ठेवली जात  होती. मात्र, सुशोभीकरण कामा दरम्यान काही महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही काढले असून ते नव्याने बसविण्यात कोणतीही उपाय योजना नसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.



          या आधी शहराच्या बाजारपेठे मधे पर्यटकांचे मोबाईल, पर्स, मौल्यवान साहित्य हरवणे तसेच बाजार पेठेतून फिरताना लहान मुले हरविण्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा प्रसंगी सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरत होती. मात्र आता हीच यंत्रणा बंद असल्याने नागरिक व पर्यटकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.सुशोभीकरणासोबतच शहराच्या सुरक्षेलाही तितकेच प्राधान्य देऊन तातडीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.



         याच बरोबर येथील मस्जिद रोड येथील पार्किंग मध्ये देखील गाड्यांचे लोगो आरसे पेट्रोल चोरी  असे बरेच प्रकार घडतात तर शहरातील येण्या जाण्या साठी वापरतात असणाऱ्या अंतर्गत  सार्वजनिक बोळांमध्ये पावसाळ्या मध्ये घर फोडीच्या  घटना घडल्या होत्या यामुळे येथील सार्वजनिक बोळांमध्ये देखील पथदिवे बसवून सीसीटीव्हीची यंत्रणा राबवावी अशी मागणी  देखील स्थानिकां मधून होत आहे .