Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

पाचगणी नगरपरिषदेतील बहुमत सत्ताधाऱ्यांकडे;

 ' पाचगणी नगरपरिषदेतील बहुमत सत्ताधाऱ्यांकडे; विरोधक दबावात'

महाबळेश्वर टाईम्स

पाचगणी | प्रतिनिधी : नौशाद सय्यद



पाचगणी नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर शहराच्या राजकारणात झपाट्याने घडामोडी घडत असून नगरपरिषदेतील सत्ता समीकरण सत्ताधारी गटाच्या बाजूने अधिक भक्कम झाले आहे. अवघ्या दहा दिवसांतच सत्ताधारी आघाडीच्या संख्याबळात वाढ झाल्याने विरोधी गट अल्पमतात आला आहे.


निवडणूक निकालानंतर दिलीप बगाडे यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सत्ताधारी आघाडीकडे सुरुवातीला १५ नगरसेवकांचे संख्याबळ होते. त्यानंतर नगरसेविका शिल्पा माने यांच्या समावेशामुळे सत्ताधारी गटाची ताकद वाढून ती आता १६ वर पोहोचली आहे.

याउलट विरोधी कन्हाडकर गटाची संख्या घटून आता केवळ पाच नगरसेवकांपुरती मर्यादित राहिली आहे. त्यामुळे नगरपरिषदेतील बहुमत स्पष्टपणे सत्ताधारी गटाकडे गेले असून प्रशासनावर त्यांचा प्रभाव वाढल्याचे चित्र आहे.

निवडणुकीनंतर अल्पावधीतच झालेल्या या राजकीय उलथापालथीमुळे पाचगणी शहरात चर्चांना उधाण आले आहे. आगामी काळात विकासकामे, निधीवाटप आणि निर्णयप्रक्रियेत सहभाग या मुद्द्यांमुळे आणखी काही नगरसेवक सत्ताधारी गटाच्या संपर्कात येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नागरिकांमध्ये मात्र या सत्तांतराकडे मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सत्ता कोणाकडेही असो, शहराचा विकास, पारदर्शक कारभार आणि नागरी सुविधा या मुद्द्यांना प्राधान्य दिले जावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पुढील काळात नगरपरिषदेत प्रत्यक्ष कामकाजातूनच सत्ताधाऱ्यांची भूमिका स्पष्ट होईल, अशी चर्चा जनतेमध्ये सुरू आहे.

सध्याच्या स्थितीत नगरपरिषदेतील बहुमत सत्ताधाऱ्यांकडे असले तरी विरोधी गटाचा प्रशासकीय अनुभव लक्षात घेता येणाऱ्या काळात नगरपरिषदेत चर्चा, टीका आणि विरोधाची भूमिका कितपत प्रभावी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.