पाचगणीतील परप्रांतीय कामगारांचे चारित्र्य पडताळणी करावी; झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षकांना निवेदन
महाबळेश्वर टाईम्स
पाचगणी (प्रतिनिधी):
पाचगणी शहर आणि परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच शांतता व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी, स्थानिक व परप्रांतीय ठेकेदारांकडे कामाला येणाऱ्या सर्व कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन (चारित्र्य पडताळणी) करण्यात यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल आणि महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल यांच्यावतीने पाचगणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना देण्यात आले.
पाचगणी हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने येथे हॉटेल, शाळा, लॉजिंग, बांधकाम आणि माळीकामासाठी परराज्यातून येणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे.अनेक ठेकेदार आपल्यासोबत येणाऱ्या कामगारांची माहिती पोलीस स्टेशन किंवा संबंधित गावातील पोलीस पाटील यांच्याकडे जमा करत नाहीत. कामगारांचा कायमचा पत्ता, सध्याचा पत्ता, नागरिकत्व, संपर्क क्रमांक आणि भाडे करार यांची अधिकृत नोंद होणे आवश्यक आहे. जर एखाद्या कामगाराकडून गैरप्रकार घडला किंवा ठेकेदाराने माहिती लपवली, तर संबंधित ठेकेदारावर कायदेशीर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच बालकामगार आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हे व्हेरिफिकेशन काळाची गरज असल्याचे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
हे निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. अभिजीत (सनी) ननावरे, महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. नितीन वन्ने, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (कामगार आघाडी) जिल्हाध्यक्ष श्री. ऋषिकेशजी वायदंडे यांच्यासह श्री. संजय वन्ने, श्री. वैजनाथ प्रभाळे, श्री. सुमित प्रभाळे, श्री. शुभम ननावरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी या निवेदनाची दखल घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin