महाबळेश्वर / जिल्हा परिषदे मध्ये तळदेव गटावर व कुंभरोशी व तळदेव गणावर शिवसेनेचा भगवा, भिलार गट राष्ट्रवादी किल्ला अबाधित मेटगुताड व भिलार गणात राष्ट्रवादी विजयी
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर दि ९ ( संदेश भिसे )
कुंभरोशी गण शिवसेना विजयी उमेदवार संजय मोरे / तळदेव जिल्हा परिषद गट उमेदवार अजित सकंपाळ
महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून, या निकालांनी तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. काही गटांत सत्ता परिवर्तन घडले, तर काही ठिकाणी पारंपरिक बालेकिल्ले कायम राहिले. एकूणच मतदारांनी विभागून, पण ठाम कौल दिल्याचे चित्र समोर आले आहे.
भिलार गटात राष्ट्रवादीचा एकतर्फी विजय
भिलार गट आणि गणात राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखत विरोधकांवर निर्णायक मात केली आहे.
जिल्हा परिषद भिलार गटात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय केळगणे यांनी तब्बल ८,७८८ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भाजपच्या रंजना कदम (२,३५३ मते) यांचा ६,०९३ मतांच्या फरकाने पराभव केला. या लढतीत संदीप चपटे यांना १,१७५ मते मिळाली.
राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार
पंचायत समिती भिलार गणातही राष्ट्रवादीचीच सरशी राहिली. वंदना प्रवीण भिलारे यांनी ५,१३६ मते मिळवत भाजपच्या सुप्रिया भिलारे (९९२ मते) यांचा ४,१४४ मतांनी पराभव केला. या निकालामुळे भिलार हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अजून मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
तळदेव गटात शिवसेनेची दमदार मुसंडी
तळदेव गटात मात्र चित्र पूर्णपणे वेगळे पाहायला मिळाले. येथे राष्ट्रवादीला मोठा धक्का देत शिवसेनेने सत्ता हस्तगत केली आहे.
जिल्हा परिषद तळदेव गटात शिवसेनेचे अजित संकपाळ यांनी ७,६७३ मते मिळवत राष्ट्रवादीच्या संजय गायकवाड (४,६७३ मते) यांचा ३,००० मतांनी पराभव केला. या लढतीत सुभाष सो सोंडकर यांना ५५७ मते मिळाली.
पंचायत समिती तळदेव गणातही शिवसेनेचे वर्चस्व राहिले. संजय शेलार यांनी ४,२८२ मते मिळवत राष्ट्रवादीच्या संजय उतेकर (२,२७२ मते) यांचा २,०१० मतांनी पराभव केला. तळदेवमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
कुंभरोशी गणात शिवसेना विजयी
कुंभरोशी गणात अत्यंत चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे संजय मोरे यांनी २,७७२ मते मिळवत सचिन उतेकर (२,४३८ मते) यांचा केवळ ३३४ मतांनी पराभव केला. ही लढत शेवटपर्यंत रंगतदार ठरली. तर
मेटगुताड गणात राष्ट्रवादीने आपले अस्तित्व कायम ठेवले. शकुंतला चोरमले यांनी २,७८४ मते मिळवत भाजपच्या अमिना शारवान (१,६९८ मते) यांचा १,०८६ मतांनी पराभव केला.
थोडक्यात निकाल
भिलार गट (जि.प.) – संजय केळगणे (राष्ट्रवादी) | मताधिक्य: ६,०९३
तळदेव गट (जि.प.) – अजित संकपाळ (शिवसेना) | मताधिक्य: ३,०००
भिलार गण (पं.स.) – वंदना भिलारे (राष्ट्रवादी) | मताधिक्य: ४,१४४
तळदेव गण (पं.स.) – संजय शेलार (शिवसेना) | मताधिक्य: २,०१०
कुंभरोशी गण (पं.स.) – संजय मोरे (शिवसेना) | मताधिक्य: ३३४
मेटगुताड गण (पं.स.) – शकुंतला चोरमले (राष्ट्रवादी) | मताधिक्य: १,०८६
महाबळेश्वर तालुक्यातील या निवडणूक निकालांनी मतदारांनी स्थानिक नेतृत्व, कामगिरी आणि विश्वास याला अधिक महत्त्व दिल्याचे स्पष्ट केले आहे. तळदेव व कुंभरोशी भागात शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ प्रभावी ठरला, तर भिलार आणि मेटगुताड मध्ये राष्ट्रवादीच्या ‘घड्याळा’चा गजर कायम राहिला.
भाजपला मात्र या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसून, आगामी काळात संघटनात्मक पुनर्रचना आणि आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे या निकालातून स्पष्ट होते.




Social Plugin