सातारा वनविभागाचा शिकाऱ्यांना दणका
महाबळेश्वर मध्ये रानडुक्कर शिकार प्रकरणी दोन जण ताब्यात तर एक वाहन जप्त
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : संदेश भिसे
सांडपाणी व स्वच्छता मोहिमेनंतर वनसंवर्धनाच्या दृष्टीने कठोर पावले उचलत सातारा वन विभागाने रानडुक्कर शिकार प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एक मारुती ओमनी गाडी जप्त करण्यात आली असून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दि. १७/०२/२०२६ रोजी वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे हे वनरक्षक तुकाराम निकम (तळदेव, अतिरिक्त कार्यभार महाबळेश्वर) यांच्यासह गस्त घालत असताना महाबळेश्वर फॉरेस्ट कंपार्टमेंट क्र. ७९, मधुसागर राईड परिसरात संशयास्पद हालचाल आढळली.
तपासणीदरम्यान आरोपी संजय लक्ष्मण गोळे व अजय महादेव कोंढाळकर (रा. लिंगमळा, ता. महाबळेश्वर) हे वन्यप्राणी रानडुक्कराची शिकार करून गाडी क्र. MH-08-R-0663 मधून नेत असताना मुद्देमालासह पकडण्यात आले.
या प्रकरणी भारतीय वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ मधील कलम २, ९, ३९, ४४, ४८ व ५१ अन्वये प्र.गु.रि.क्र. ०२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील मारुती ओमनी वाहन जप्त करण्यात आले असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती वनविभागाने दिली.घटनास्थळी सहायक वनसंरक्षक (वनीकरण) प्रदीप रौंधळ व वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते यांनी भेट देऊन चौकशी केली. आरोपींचे जबाब नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
वन्यप्राण्यांची शिकार करणे हा गंभीर गुन्हा असून संबंधित कायद्यानुसार १ ते ३ वर्षांपर्यंत कारावास किंवा २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत दंड, अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते (भा.व.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत वनविभागातील अधिकारी, कर्मचारी व रोजंदारी मजूर सहभागी होते.
नागरिकांना आवाहन
वनविभागाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही वन्यप्राण्याची शिकार करणे, त्यांना इजा पोहोचवणे, खाऊ घालणे किंवा वनक्षेत्रात कचरा टाकणे, सांडपाणी सोडणे यांसारखे अवैध प्रकार आढळल्यास तात्काळ वनविभागास माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin