महाबळेश्वर इनर व्हील क्लबचा ‘हॅपी स्कूल’ उपक्रम नांदवळ येथे उत्साहात अध्यक्षा वर्षा पार्टे यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांचा पुढाकार🌈🌈🌈🌈🌈 महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर, दि. १८-०२-२०२६ :
सेवाकार्यात अग्रेसर असलेल्या इनर व्हील क्लब ऑफ महाबळेश्वरच्यावतीने कोरेगाव तालुक्यातील नांदवळ येथील संत निवृत्तीनाथ महाराज वारकरी सांप्रदायिक शिक्षण संस्थेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी “हॅपी स्कूल” प्रकल्प राबविण्यात आला.
क्लबच्या अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे, पीडीसी रोहिणी वैद्य व सचिव सपना अरोरा यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी सामाजिक कार्यकर्ते शिरीष गांधी यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला. या प्रकल्पाअंतर्गत संस्थेतील विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांसाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले. तसेच पुढील एक वर्ष पुरेल इतके किराणा साहित्य, कपडे व अन्य आवश्यक वस्तू संस्थेचे प्रमुख आदित्य महाराज झगडे व दिनकर महादेव झगडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.
अनाथ विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाकघर व स्वच्छतागृह बांधकामासाठी रोख आर्थिक मदत देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन शालेय बॅगा, बूट, ब्लँकेट्स, बेडशीट्स आदी जीवनावश्यक वस्तूंचेही वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी लॅपटॉप व दूरदर्शन संच प्रदान करण्यात आले. तसेच स्वच्छ पाण्याची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून १० हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था करण्यात आली.
इनर व्हील क्लब ऑफ महाबळेश्वरने अभिनव व नाविन्यपूर्ण सेवाभावी उपक्रमांमुळे जिल्ह्यात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. गेली अनेक वर्षे क्लब महाबळेश्वर व परिसरात सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत असून गरजूंच्या मदतीसाठी कायम तत्पर असतो. सामाजिक कार्यकर्ते शिरीष गांधी यांनी नांदवळ येथील संत निवृत्तीनाथ महाराज वारकरी सांप्रदायिक शिक्षण संस्थेमध्ये शिकत असलेल्या गरजू मुलांसाठी मदतीची विनंती केल्यानंतर अध्यक्षा वर्षा पार्टे व सदस्यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत संस्थेला “हॅपी स्कूल” करण्याचा निर्णय घेतला.
आश्रमास नगराध्यक्ष श्री. सुनील शिंदे, उपनगराध्यक्ष श्री. नासीरभाई मुलाणी तसेच नगरसेवक आबा शिंदे, ॲड. संजय जंगम, अफजल सुतार, रोहित ढेबे, रवी कुंभारदरे, विमलताई पारटे, पल्लवी कोंडाळकर आणि स्मिता पाटील या सर्व मान्यवरांनी उदार आर्थिक सहाय्य देत संस्थेच्या कार्याला भक्कम पाठबळ दिले.
तसेच एस.के.पॅलेसचे सत्यवान कदम,हॉटेल आरामचे बंडूशेठ रानडे,सन राईज कॅण्डलच्या निता भावेश भाटिया,आर के पाटील अँड सन्सचे सुनील पाटील या उपक्रमात योगदान दिले प्रारंभी या मुलांच्या वतीने मान्यवरांचे टाळ मृदूंगाच्या गजरात स्वागत करण्यात आले.
या प्रकल्पासाठी अध्यक्षा वर्षा पार्टे, पीडीसी रोहिणी वैद्य, सचिव सपना अरोरा, सविता पलोड, राधा मुक्कावर, वंदना पल्लोड, लक्ष्मी यारलागड्डा तसेच सर्व इनर व्हील सदस्य उपस्थित होते. सदस्यांच्या एकजुटीमुळे व नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाला.
या सामूहिक प्रयत्नांमुळे आश्रमातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि राहणीमानात सकारात्मक व दीर्घकालीन बदल घडून येणार असून समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन केलेल्या कार्याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.




Social Plugin