Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

आंबेनळी घाटात वॅग्नर कार ३००-४०० फूट दरीत; पाच जखमींना सर्च-रेस्क्यू टीमने दिला जीवदान

 आंबेनळी घाटात वॅग्नर कार ३००-४०० फूट दरीत; पाच जखमींना सर्च-रेस्क्यू टीमने दिला जीवदान



महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर, (संदेश भिसे)


            आज पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास आंबेनळी घाटातील बावली टोक परिसरात एक वॅग्नर कार सुमारे ३०० ते ४०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या घटनेची माहिती प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य संकेत सावंत व ऋषिकेश जाधव यांना मिळताच त्यांनी तत्काळ टीमच्या ग्रुपवर कळवले.

माहिती मिळताच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य अजित जाधव, अनिकेत वागदरे, संकेत सावंत, ऋषिकेश जाधव व आशिष बिरामने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनाही घटनेची माहिती देण्यात आली.


घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्वप्रथम बचावकार्याचा आवश्यक सेफ्टी सेटअप करण्यात आला. त्यानंतर रोपच्या सहाय्याने टीमचे सदस्य खोल दरीमध्ये उतरले. गाडीतील जखमींना शोधून सर्वात गंभीर जखमी व्यक्तीला स्ट्रेचरच्या सहाय्याने व रोपच्या मदतीने सुरक्षितपणे वर आणण्यात आले. त्यानंतर उर्वरित सर्व जखमींनाही सुरक्षितरीत्या वर काढण्यात बचाव पथकाला यश आले.

या अपघातातील गाडीत एकूण पाच प्रवासी असून सर्व जखमी आहेत. हे सर्व जण लाखवड (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


     जखमींना तातडीने प्राथमिक उपचारासाठी महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सातारा येथे हलविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.


     या बचावकार्यात प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अनिकेत वागदरे, अजित जाधव, ऋषिकेश जाधव, आशिष बिरामने, संकेत सावंत तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील (बाबा) भाटिया, अमित कोळी, सुजित कोळी, सोमनाथ वागदरे यांनी सहभाग घेतला. याशिवाय वाडा कुंभरोशी व चिरेखिंड येथील ग्रामस्थ तसेच पोलादपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनीही मदत केली.


  वेळेत पोहोचून धाडसाने केलेल्या या बचावकार्यातून पाचही जखमींना बाहेर काढण्यात यश आल्याने स्थानिकांनी सर्च अँड रेस्क्यू टीम व महाबळेश्वर ट्रेकर्स च्या कार्याचे कौतुक केले आहे.



                         बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                                     संपादक :- राहुल शेलार 

                                      📱 9765576377

                           कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                                      📱 9403546 485