Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर: रस्ते कामात निकृष्ट दर्जा; संतप्त नगरसेवकांचा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या*

 *महाबळेश्वर: रस्ते कामात निकृष्ट दर्जा; संतप्त नगरसेवकांचा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या*

महाबळेश्वर टाईम्स


महाबळेश्वर:महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेमार्फत शहरात सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करत, शहरातील विरोधी  पक्ष नगरसेवकांनी आज नगरपरिषद प्रशासनाला धारेवर धरले. ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा जाब विचारण्यासाठी सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडला.

 

  महाबळेश्वर शहरात सध्या रस्ते काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी नगर सेवक कुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवकांनी अचानक भेट दिली असता, कामाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. निविदेतील   अटी आणि शर्तींचे उल्लंघन करून हे काम केले जात असल्याचे दिसून आले.

 

 निकृष्ट काँक्रीट : रस्ते कामासाठी 'M40' ग्रेडचे काँक्रीट वापरणे बंधनकारक असताना, प्रत्यक्षात अतिशय हलक्या दर्जाचे काँक्रीट वापरले जात आहे. रस्ता तयार करताना पेव्हर मशीन आणि व्हायब्रेटर रोलरचा वापर करणे आवश्यक आहे, मात्र ठेकेदाराकडून केवळ काँक्रीट ओतून थातूरमातूर काम केले जात आहे.  कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सॅम्पल ब्लॉक (Sample Blocks) घेतलेले नाहीत, तसेच बॅच रिपोर्टही उपलब्ध नाहीत. सिव्हिल इंजिनिअर असतानाही या कामाचा पदभार मेकॅनिकल इंजिनिअरकडे का सोपवण्यात आला, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

 

नगरसेवकांनी तक्रार केल्यानंतर इंजिनिअरने क्वालिटी रिपोर्ट येईपर्यंत काम थांबवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आज सकाळी 'जेव्हीडी एम्पायर' या ठेकेदाराने पुन्हा घाईघाईने निकृष्ट दर्जाचे काम सुरू केल्याने नगरसेवक अधिकच संतप्त झाले.

हा जनतेचा पैसा आहे आणि तो ठेकेदाराचे घर भरण्यासाठी नाही, तर नागरिकांच्या सोयीसाठी वापरला गेला पाहिजे. महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना चांगल्या सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. या भ्रष्ट कारभाराविरोधात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहोत असल्याचे नगर सेवक कुमार  शिंदे यांनी या प्रसंगी सांगितले.

 


या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषी ठेकेदारावर कडक कारवाई करावी आणि कामाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी सर्व विरोधी नगरसेवक आता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. प्रशासनाने यावर योग्य कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी नगरसेवक सेवक कुमार शिंदे, राजुभाई नालबंद, शबाना मानकर, मिलिंद ढेबे, विजय बिरामणे उपस्थित होते.