शिवसैनिक व भाविक भक्तांच्या आंदोलनाला यश; हनुमान मंदिर मार्गाचा प्रश्न मार्गी
महाबळेश्वर टाईम्स महाबळेश्वर प्रतिनिधीमहाबळेश्वर : श्री हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील प्रवेशद्वार बंद केल्याच्या निषेधार्थ महाबळेश्वर शहर शिवसेनेने केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले होते. त्यानंतर द क्लब महाबळेश्वरच्या व्यवस्थापनासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्याने निर्माण झालेला तणाव निवळला आहे.
द क्लबच्या अध्यक्षा मनीषा गोखले-शहा, क्लब व्यवस्थापन आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये द क्लब येथे झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. वेण्णा लेक परिसरातील हिंदू वीरशैव दफनभूमी, अग्निसंस्कार स्थळ, पारशी कब्रस्थान तसेच श्री हनुमान मंदिराकडे जाण्यासाठी ब्रिटिशकालापासून तहसीलदार कार्यालय मार्गे द क्लब गोल्फ मैदानातून जाणाऱ्या रस्त्याचा वापर होत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
अलीकडेच क्लब प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता प्रवेशद्वाराला कुलूप लावून मार्ग बंद केल्याने स्थानिक नागरिक, हनुमान भक्त आणि पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. यानंतर शिवसेनेने आंदोलन करून प्रवेशद्वार उघडण्याची मागणी केली होती.
बैठकीत द क्लबच्या अध्यक्षा मनीषा गोखले-शहा यांनी हनुमान भक्त, पर्यटक, पारशी कब्रस्थान तसेच दफनभूमी आणि अग्निसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना ये-जा करण्यास कोणताही अडथळा निर्माण केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. उत्सवकाळात तसेच आवश्यकतेनुसार वाहनांच्या वाहतुकीलाही परवानगी राहील, असे त्यांनी सांगितले.
सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी प्रवेशद्वार बंद ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर आपत्कालीन परिस्थितीत प्रवेशद्वार उघडता यावे यासाठी चावी सुरक्षा रक्षकाकडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच रात्रीच्या वापरासाठी नोंदवही ठेवण्यासही दोन्ही पक्षांनी सहमती दर्शविली. या निर्णयांची नोंद करून प्रवेशद्वारावर माहिती फलक लावण्याचेही ठरले.
सकारात्मक चर्चेतून मार्ग काढण्यात आल्याने हनुमान भक्त, स्थानिक नागरिक आणि क्लब प्रशासन यांच्यातील तणाव अखेर निवळला. शिवसेना शिष्टमंडळानेही सहकार्याबद्दल द क्लब प्रशासनाचे आभार मानले.
यावेळी सातारा जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, शहरप्रमुख राजाभाऊ गुजर, विभागप्रमुख शंकर ढेबे, प्रवीण (नाना) कदम, शहानवाज खारखंडे तसेच शिवसैनिक व पत्रकार राजेश सोंडकर उपस्थित होते.


Social Plugin