Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे कोलमडला; नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती

महाबळेश्वरमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे कोलमडला; नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती.....



महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर : प्रतिनिधी 

राज्यात सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये सध्या 'धरण उशाला अन् कोरड घशाला' अशी अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहराचा मुख्य जलस्रोत असलेल्या वेण्णा तलावात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही, केवळ वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे महाबळेश्वरकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यातच नगरपालिकेचा टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठाही बंद असल्याने नागरिकांचे हाल आणखीनच वाढले आहेत.

​सध्या उन्हाळी पर्यटनाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, शहरात दररोज हजारो पर्यटक दाखल होत आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. याचा फटका स्थानिक नागरिकांसह व्यावसायिक आणि पर्यटकांनाही बसत आहे.

​शहरातील मुख्य भाग असलेल्या बाजारपेठ, डॉ. साबणे रोड, कोळी आळी, रामगड, अंबिका व नामदेव सोसायटी, नगरपालिका सोसायटी, स्कूल मोहल्ला आणि गवळी मोहल्ला या प्रमुख भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे कोलमडला आहे.

तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा ठप्प

​महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (म.जी.प्रा.) वेण्णा लेक पंपिंग स्टेशनवरील दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. म.जी.प्रा. पाचगणी उपविभागाने दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार वेण्णा लेक येथील १५ HP क्षमतेचा पंप जळाल्यामुळे महाबळेश्वरवरून येणारे पाणी अत्यंत कमी दाबाने येत आहे. सदर मोटर दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत पाणी पुरवठा कमी दाबाने किंवा विस्कळीत होणार आहे.

​या तांत्रिक बिघाडामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरात पाण्याचा थेंबही आलेला नाही. प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असले, तरी पाणी नसल्याने नागरिकांचा संयम सुटत चालला आहे.

​वेण्णा तलावात पाणी असूनही नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने ही कृत्रिम पाणीटंचाई असल्याचा संताप व्यक्त होत आहे. आता या गंभीर समस्येतून महाबळेश्वरकरांची सुटका करण्यासाठी पालिका प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी नक्की काय आणि किती वेगाने पावले उचलतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.




       बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                संपादक :- राहुल शेलार 

                     📱 9765576377

            कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 

                     📱 9403546 485