माचुतर शाळेत शिक्षणाची गुढी उभारून उत्साहात प्रवेशोत्सव साजरा
मराठी शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे मान्यवरांकडून कौतुक; नवदाखल विद्यार्थ्यांचे स्वागत
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर(सातारा)
स्थानिक जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा माचुतर येथे १५ जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शालेय 'प्रवेशोत्सव' मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. याप्रसंगी शिक्षण आणि ज्ञानाची गुढी उभारून नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले, तसेच जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक घोषवाक्ये दिली.
या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून महाबळेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विभुते, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. सावंत तसेच जिल्हा सहाय्यक आरोग्य अधिकारी सुनील चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या इंग्रजी संभाषणाने वेधले लक्ष
शाळेच्या संगीतमय परिपाठाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक बाबींचे आणि इंग्रजी संभाषणाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. विद्यार्थ्यांचा हा आत्मविश्वास पाहून उपस्थित मान्यवरांनी माचुतर शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे विशेष कौतुक केले व गौरवोद्गार काढले. शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची प्रशंसा करत मान्यवरांनी पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
नूतन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत
या शैक्षणिक वर्षात टेकवली, मोळेश्वर, आढाळ धारदेव, रेगडीमुरा आणि रेंगडी परिसरातून शाळेत नव्याने दाखल झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन अत्यंत उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन शिंदे, माजी सरपंच आदरणीय नारायण शिंदे, सहदेव शिंदे, श्री. राजेंद्र जाधव (टेकवली) यांच्यासह मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एल. डी. जाधव सर, पदवीधर शिक्षक शांताराम मोरे, संतोष चोरगे, अनिसा वारुणकर आणि संतोष वळकुंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin