महाबळेश्वर येथील गोल्फ ग्राउंड परिसरात ३४ झाडांची बेकायदेशीर कत्तल; अध्यक्षांसह तिघांवर गुन्हा दाखल.....
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीतील गोल्फ ग्राऊंड येथील 'द क्लब' च्या ताब्यात असलेल्या जमिनीमध्ये अंतर्गत रस्ते तयार करण्यासाठी तब्बल ३४ हजार रुपये किमतीच्या ३३ झाडांची विनापरवाना व बेकायदेशीरपणे कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महाबळेश्वर नगरपरिषदेचे वृक्ष अधिकारी कल्याण बाजीराव हिवरे (वय ५२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून महाबळेश्वर पोलीस ठाण्यात 'द क्लब'च्या अध्यक्षा, सेक्रेटरी आणि एका कन्स्ट्रक्शन ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल : श्रीमती मनिषा गोखले शहा (वय ६५, अध्यक्ष, द क्लब, महाबळेश्वर),लेफ्ट. कर्नल गौतम नंदी (निवृत्त) (वय ६२, सेक्रेटरी, द क्लब, महाबळेश्वर) व श्री सुहास पार्टे (वय ४०, रा. मेढा, ठेकेदार, द्वारकाधीश कन्स्ट्रक्शन वर्क)
तक्रारदार अनिल पंडित यांच्या तक्रारीनुसार, वाईचे उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशान्वये ११ जून २०२६ रोजी महाबळेश्वरमधील सि.स.नं. ११७ व ११८ या मिळकतीची संयुक्त शासकीय पाहणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान वाईचे उपविभागीय अधिकारी, महाबळेश्वरचे तहसीलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक आणि वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या संयुक्त पाहणीत असे आढळून आले की, गोल्फ ग्राऊंड येथील जमीन विकसनाच्या कामात अंतर्गत नवीन रस्ते तयार करण्यासाठी जेसीबी यंत्राच्या साहाय्याने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीरपणे वृक्षतोड करण्यात आली आहे.
मागील १५ ते २० दिवसांच्या कालावधीत ही वृक्षतोड झाली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने २९ नैसर्गिक झाडे मुळासकट पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहेत.
४ मोठ्या झाडांच्या फांद्या जेसीबीच्या साहाय्याने तोडून मोडतोड करण्यात आली आहे.
नष्ट करण्यात आलेल्या वृक्षांमध्ये जांभूळ, अंजन, बोबडसा, कावळा, पिसा, गेळा यांसारख्या मौल्यवान आणि नैसर्गिक प्रजातींचा समावेश आहे. संशयितांनी वृक्षतोड करून शासकीय परवानगीशिवाय लाकूडमालाची परस्पर विल्हेवाट लावत सुमारे ३४,००० रुपयांचे नुकसान केले आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत महसूल, वनविभाग आणि भूमी अभिलेख विभागाने तात्काळ घटनास्थळी संयुक्त पंचनामा केला. मुख्याधिकारी महाबळेश्वर नगरपरिषद आणि उपविभागीय अधिकारी वाई यांच्या आदेशानंतर वृक्ष अधिकारी कल्याण हिवरे यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली.
पोलिसांनी संशयितांविरुद्ध महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन व संवर्धन अधिनियम १९७५ चे कलम २१ (१) (२), ११/१ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३२४ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक बी.पी.सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर पोलिस अंमलदार अवघडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin