Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

मुसळधार पावसामुळे नावली गावातील काही भाग खचला

 

मुसळधार पावसामुळे नावली गावातील काही भाग खचला



प्रशासनाने केले नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; गावाला कोणताही धोका नाही – तहसीलदार सचिन म्हस्के

महाबळेश्वर | प्रतिनिधी


महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नावली गावातील वरच्या बाजूचा जमिनीचा काही भाग शनिवारी सकाळी खचला. या घटनेत झाडांसह मातीचा मोठा भाग रस्त्यावर कोसळून मलबा साचला. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मलबा हटविण्याचे काम सुरू केले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.


खचलेल्या ठिकाणाजवळ गावाची पाण्याची टाकी असल्याने प्रशासनाने तत्काळ पाहणी सुरू केली. प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून पाण्याच्या टाकीची आणि परिसराची तांत्रिक पाहणी करण्यात येत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

घटनास्थळाजवळील चार घरांपैकी एक घर बंद असून उर्वरित तीन घरांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. प्रशासनाकडून पुढील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

"गावाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरवू नयेत. प्रशासन परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे," असे आवाहन तहसीलदार सचिन म्हस्के यांनी केले.