*महाबळेश्वरमध्ये अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा; तातडीने दुरुस्ती करण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे आदेश
महाबळेश्वर प्रतिनिधी,18-
महाबळेश्वर शहर आणि परिसरात ५ व ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून बैठकीत तातडीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. मंत्री मकरंद पाटील यांनी रस्ते, संरक्षक भिंती, पाणीपुरवठा, सार्वजनिक सुविधा आणि दरडग्रस्त भागांचा आढावा घेत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
अतिवृष्टीमुळे सर्वसामान्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी नुकसानग्रस्त भागांत तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले तसेच, भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी आपत्ती निवारणाचे दीर्घकालीन नियोजन करण्याचेही त्यांनी प्रशासनाला बजावले.
विकासासोबतच नागरिकांना सक्षम पायाभूत सुविधा देण्यास शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे सर्व विकासकामे आणि दुरुस्तीची कामे दर्जेदार पद्धतीने आणि दिलेल्या वेळेतच पूर्ण झाली पाहिजेत, असे स्पष्ट आदेश मदत व पुनर्वसन मंत्रीत श्री. पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


Social Plugin