Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरच्या जंगलात दुर्मिळ ऑर्किडचे 'दुहेरी यश'; १२५ वर्षांनंतर 'पिनालिया म्हैसूरएन्सिस'चा पुनर्शोध, तर 'ओबेरोनिया चंद्रशेखराणी'ची महाराष्ट्रात प्रथमच नोंद

 महाबळेश्वरच्या जंगलात दुर्मिळ ऑर्किडचे 'दुहेरी यश; १२५ वर्षांनंतर 'पिनालिया'चा पुनर्शोध, तर ओबेरोनिया'ची महाराष्ट्रात प्रथमच नोंद 



महाबळेश्वर टाईम्स 

​महाबळेश्वर(संदेश भिसे)

जागतिक जैवविविधतेचा हॉटस्पॉट असलेल्या पश्चिम घाटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील वाडा-कुंभरोशी परिसरातील जंगलात वनस्पती संशोधकांना दुर्मिळ ऑर्किड संदर्भात 'दुहेरी यश' आले आहे. 'ओबेरोनिया चंद्रशेखराणी' (Oberonia chandrasekharanii) या दुर्मिळ स्थानिक ऑर्किडची महाराष्ट्रातून प्रथमच नोंद झाली असून, 'पिनालिया म्हैसूरएन्सिस' (Pinalia mysorensis) या ऑर्किड प्रजातीचा तब्बल १२५ वर्षांनंतर महाराष्ट्रात पुनर्शोध लागला आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण संशोधनांमुळे महाबळेश्वरच्या समृद्ध निसर्गाची आणि जैवविविधतेची ओळख जागतिक पातळीवर पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

​भारतीय वनस्पती सर्वेक्षण (BSI) चे डॉ. जीवन सिंह जलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सागर दिलीप कुलकर्णी, यसस्विनी राऊत, आकाश तानाजी राऊत, मयुरेश प्रशांत कुळकर्णी आणि शर्विल अनिल बिडकर या तरुण संशोधकांच्या पथकाने हे शोधकार्य पूर्ण केले आहे.


​'ओबेरोनिया चंद्रशेखराणी' संदर्भातील शोधनिबंध 'बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया'च्या 'Nelumbo' या प्रतिष्ठित संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

​'पिनालिया म्हैसूरएन्सिस' संदर्भातील संशोधन नुकतेच ४ जुलै २०२६ रोजी 'International Journal of Botany Studies' मध्ये प्रकाशित झाले आहे.



​महाबळेश्वर परिसरातील जंगलात वनभ्रमंती करत असताना या संशोधक पथकाला एका जुन्या आंब्याच्या झाडावर ऑर्किडची एक आगळीवेगळी वनस्पती आढळून आली. अभ्यासकांनी सातत्याने याचे निरीक्षण केले. या वनस्पतीला फुले आल्यानंतर तिचे नमुने गोळा करून शास्त्रीय पडताळणी करण्यात आली असता, ती 'पिनालिया म्हैसूरएन्सिस' (म्हैसूर इरिया) असल्याचे स्पष्ट झाले.

​विशेष म्हणजे, महाबळेश्वरमध्ये या प्रजातीची शेवटची नोंद ब्रिटिश काळात, म्हणजेच सन १९०० मध्ये झाली होती. त्यानंतर सलग सव्वाशे वर्षे ही वनस्पती महाराष्ट्रात कुठेही आढळली नव्हती. त्यामुळे ती राज्यातून नामशेष झाली असावी, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, १२५ वर्षांनंतर लागलेल्या या पुनर्शोधामुळे वनस्पतिशास्त्रज्ञांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


 ओबेरोनिया चंद्रशेखराणीची राज्यात पहिलीच नोंद 

​याच मोहिमेदरम्यान संशोधकांनी 'ओबेरोनिया चंद्रशेखराणी' या अत्यंत दुर्मिळ ऑर्किडचा शोध लावला. या प्रजातीची महाराष्ट्रातील ही पहिलीच अधिकृत नोंद ठरली आहे. या शोधामुळे महाराष्ट्राच्या वनसंपदेत आणि विशेषतः ऑर्किड वनस्पतींच्या यादीत एका अत्यंत मौल्यवान प्रजातीची भर पडली आहे.

संवर्धनाची तातडीची गरज: पर्यावरण अभ्यासकांचे मत

​आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने (IUCN) 'ओबेरोनिया चंद्रशेखराणी' या प्रजातीला 'असुरक्षित' (Vulnerable) श्रेणीत समाविष्ट केले आहे. दुसरीकडे, 'पिनालिया म्हैसूरएन्सिस' ही प्रजाती सध्या धोक्याबाहेर (Least Concern) असली, तरी महाबळेश्वर आणि आसपासच्या परिसरात वाढणारे नागरीकरण, जंगलांचे विखंडीकरण आणि विविध विकासकामामांमुळे या वनस्पतींच्या मूळ अधिवासाला मोठा धोका निर्माण झाला आहे.


महाबळेश्वरच्या जंगलात झालेले हे दोन्ही शोध केवळ वनस्पतिशास्त्राच्या दृष्टीनेच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम घाटाच्या पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत मैलाचे दगड ठरणार आहेत. या दुर्मिळ वनस्पतींचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांच्या अधिवासाचे तातडीने संवर्धन करण्याची गरज पर्यावरण अभ्यासक आणि संशोधकांनी व्यक्त केली आहे.

      बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

               संपादक :- राहुल शेलार 

                📱 9765576377

        कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                📱 9403546 485