Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर मध्ये डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी पोलिसांची बाजारपेठेतून जनजागृती प्रभात फेरी; पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन

 महाबळेश्वर मध्ये डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी पोलिसांची बाजारपेठेतून जनजागृती प्रभात फेरी; पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन



महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर प्रतिनिधी 

महाबळेश्वर मध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सण डीजे आणि डॉल्बीमुक्त वातावरणात शांततेत पार पडावा, या उद्देशाने आज, १ सप्टेंबर रोजी बाजारपेठ परिसरातून विशेष जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. या फेरीत पोलीस कर्मचारी, होमगार्ड आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला. हातात जनजागृतीचे फलक घेऊन डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाच्या घोषणा देत सहभागींनी संपूर्ण बाजारपेठ परिसर दुमदुमून टाकला.


कर्कश आणि प्रचंड आवाजाच्या डॉल्बी सिस्टीममुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. या आवाजामुळे होणारे दुष्परिणाम, ध्वनी प्रदूषण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांबाबत नागरिकांमध्ये आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये स्पष्ट संदेश पोहोचवणे हा या प्रभात फेरीचा मुख्य उद्देश होता. फेरीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घोषणांच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.


या प्रसंगी पोलीस निरीक्षक हर्षद गालींदे यांनी उपस्थितांना आणि गणेशोत्सव मंडळांना विशेष आवाहन केले. त्यांनी सांगितले की, गणेशोत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी डॉल्बीऐवजी आपल्या ढोल-ताशा, झांज आणि पारंपरिक वाद्यांचा वापर केला पाहिजे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात शांततेत, धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकोपा जपत गणरायाचे स्वागत करावे.


ग्रामीण तसेच शहरी भागात यंदाचा गणेशोत्सव शंभर टक्के डॉल्बीमुक्त व्हावा, अशी अपेक्षा पोलीस निरीक्षक गालींदे यांनी व्यक्त केली. कायद्याचे पालन करत, आरोग्याची काळजी घेत आणि पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत गणरायाचे आगमन अधिक उत्साही व पर्यावरणपूरक वातावरणात करावे, असा संदेश या प्रभात फेरीच्या माध्यमातून सर्व नागरिकांना देण्यात आला.

बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

        संपादक :- राहुल शेलार 

             📱 9765576377

  कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                📱 9403546 485