Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

छत्रपती संभाजी महाराज वाहनतळावर प्रामाणिकपणाचा आदर्श! नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी परत केली दीड लाखांची रोकड असलेली बॅग

 छत्रपती संभाजी महाराज वाहनतळावर प्रामाणिकपणाचा आदर्श!


नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी परत केली दीड लाखांची रोकड असलेली बॅग

महाबळेश्वर टाईम्स         


महाबळेश्वर : छत्रपती संभाजी महाराज वाहनतळ परिसरात महाबळेश्वर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कता आणि प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पार्किंगच्या ठिकाणी दिल्लीचे पर्यटक संतोष कुमार यांची विसरलेली बॅग नगरपरिषद कर्मचाऱ्यांना आढळून आली. या बॅगेत तब्बल १ लाख ५० हजार रुपये रोख, मोबाईल फोन तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती.


बॅग आढळताच वाहनतळावर कार्यरत असलेले नगरपरिषद कर्मचारी प्रकाश वाडकर, अस्लम मानकर, निहाल शेख, किरण  वागदरे आणि नविलकर यांनी कोणताही लोभ न धरता ती सुरक्षित ताब्यात घेतली. त्यानंतर त्यांनी तत्परतेने बॅगेच्या मूळ मालकाचा शोध घेतला आणि बॅगेतील संपूर्ण रक्कम व इतर साहित्य जसेच्या तसे मालकाच्या स्वाधीन केले.


कर्मचाऱ्यांच्या या प्रामाणिक आणि कौतुकास्पद कृतीची दखल घेत नगराध्यक्ष सुनील शिंदे आणि मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी संबंधित कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान केला. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत, “आपल्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचा नगरपरिषदेला सार्थ अभिमान आहे,” असे गौरवोद्गार काढले.


पर्यटकांची मोठी वर्दळ असलेल्या महाबळेश्वरसारख्या पर्यटनस्थळी सापडलेली एवढी मोठी रक्कम प्रामाणिकपणे परत करून नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी ‘कर्तव्याबरोबरच माणुसकी आणि प्रामाणिकपणा’ याचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.


या आदर्शवत कृतीमुळे महाबळेश्वर नगरपरिषदेच्या प्रतिमेत निश्चितच भर पडली असून, नागरिक आणि पर्यटकांकडून संबंधित कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.