महाबळेश्वर गाईड असोसिएशनला आता ड्रेस कोड....
पोलिस निरीक्षक हर्षद गालींदे यांच्या हस्ते जॅकेट व कॅपचे वितरण...
१६० गाईड सभासदांचा उपक्रम....
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
पर्यटननगरी महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, तसेच पर्यटकांमध्ये गाईडची स्वतंत्र ओळख निर्माण होऊन पर्यटन व्यवसायाला अधिक शिस्तबद्ध स्वरूप प्राप्त व्हावे, या उद्देशाने महाबळेश्वर गाईड असोसिएशनच्या वतीने सभासदांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत संघटनेच्या सभासदांना जॅकेट व कॅपचे वितरण पोलिस निरीक्षक हर्षद गालींदे यांच्या हस्ते करण्यात आले.
माखरिया गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात पोलिस निरीक्षक हर्षद गालींदे यांनी उपस्थित गाईड सभासदांना मार्गदर्शन केले. महाबळेश्वर हे देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेले महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनस्थळांची अचूक माहिती देणे, त्यांच्याशी सौजन्यपूर्ण वर्तन ठेवणे, योग्य मार्गदर्शन करणे आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे ही प्रत्येक गाईडची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
गाईड हा केवळ पर्यटकांना पर्यटनस्थळे दाखविणारा व्यक्ती नसून तो महाबळेश्वर शहराचा प्रतिनिधी असतो. त्याच्या वागण्या-बोलण्यातून आणि शिस्तीतून शहराची प्रतिमा पर्यटकांच्या मनात निर्माण होत असते. त्यामुळे सर्व गाईडनी एकसमान गणवेश परिधान करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याबरोबरच पर्यटकांचा विश्वास संपादन करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
महाबळेश्वर गाईड असोसिएशनमध्ये एकूण १६० सभासद असून, सर्वांना एकसमान ड्रेस कोड उपलब्ध करून देण्याचा संघटनेचा हा उपक्रम निश्चितच स्वागतार्ह ठरत आहे. या माध्यमातून गाईड व्यवसायाला अधिक व्यावसायिक स्वरूप मिळण्यासह पर्यटकांनाही अधिकृत गाईड ओळखणे सोपे होणार आहे.
या कार्यक्रमास संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब ढेबे, उपाध्यक्ष जमीर मुलाणी, सदस्य किशोर मोरे, शंकर शेलार, प्रभाकर भिंगारे, शाहीद कुरेशी, रईस मानकर यांच्यासह संघटनेचे सभासद उपस्थित होते.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin