महाबळेश्वर टाईम्स✍️ महाबळेश्वरमध्ये कॅनॉटपीक जवळ ४० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या संपादक : राहुल शेलार कार्यकारी संपादक : रियाज मुजावर
महाबळेश्वर,ता.०६ महाबळेश्वरच्या प्रसिद्ध कॅनॉट पीक पॉईंट परिसरातील जंगलात एका ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गणेश शंकर शिंदे (वय ४०, रा. साई निवास, कोळी आळी, महाबळेश्वर) असे मृत व्यक्तीचे नाव असून ही घटना शनिवारी (दि. ६ डिसेंबर) दुपारी उघडकीस आली.
याबाबत मयताचा चुलत भाऊ राजू शंकर शिंदे (वय ४९, रा. रॉकडेल बंगला, महाबळेश्वर) यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश शिंदे हे शुक्रवारी (दि. ५) एका लग्न समारंभातून घरी आल्यावर रात्री सुमारे १० वाजता "बाहेर जाऊन येतो" असे सांगून घरातून निघून गेला होता. पहाटेपर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबियांनी महाबळेश्वर शहरासह परिसरात शोध घेतला; मात्र तो आढळून आला नाही. सर्वत्र शोध सुरू असताना दुपारी सुमारे १२ वाजता राजू शिंदे यांचा मुलगा संकेत याला गणेश शिंदे यांनी कॅनॉट पीक परिसरात आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर राजू शिंदे यांच्यासह सुनिल भाटीया, सुनिल ढेबे आणि सचिन ढेबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे गणेश शिंदे हा जांभळीच्या झाडाला लाल नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळला.
दरम्यान, माहिती मिळताच महाबळेश्वर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. राजू शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे महाबळेश्वर परिसरात तसेच कोळी आळी भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत गणेश हा उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू असल्याने मोठा मित्र परिवार आहे.
मृत गणेश शिंदे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई आणि भाऊ असा आप्तपरिवार आहे.
पुढील तपास पो.नि. बाळासाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. अमोल मर्ढेकर करीत आहेत.



Social Plugin