महाबळेश्वर टाईम्स ✍️ केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाबळेश्वर येथील राजभवनचे नाव झाले आता महाराष्ट्र लोकभवन
नवीन नाम फलक लावण्याचे काम युद्ध पातळीवर
महाबळेश्वर : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिले आहेत. त्यामुळे महाबळेश्वर मधील राजभवनचे तातडीने लोकभवन नामकरण करण्याची मोहीम उद्धपातळीवर चालू आहे. ठिकठिकाणी असणारे नामफलक बदलण्यात येत आहेत. राजभवन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि लोक कल्याणासाठी समर्पित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय दिशादर्शक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.‘लोकभवन’ म्हणून ओळखले जाणारे राजभवन आता केवळ राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय न राहता, राज्यातील नागरिक, समाजातील विविध घटक, विद्यार्थी, संशोधक, शेतकरी आणि नागरी संघटनांशी संवाद व सहभाग यांचे एक केंद्र व्हावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.
लोकभवन’ हे सरकार आणि राज्यातील जनतेमध्ये सेवा, सहकार्य व संवादाचा सेतू व्हावे, हीच या नामांतरामागची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.
‘लोकभवन’ केवळ संवैधानिक कर्तव्यांपुरते मर्यादित न राहता, समाजाच्या आशा, आकांक्षा आणि समस्यांप्रति संवेदनशील राहून त्यांच्याशी थेट नाते जपणारे खऱ्या अर्थाने लोकभवन असेल असे राज्यपालांनी स्पष्ट केले.






Social Plugin