Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरच्या विकासासाठी नगर विकास विभाग कडून ६४.६५ कोटींचा निधी मंजूर

 महाबळेश्वरच्या विकासासाठी नगर विकास विभाग कडून ६४.६५ कोटींचा निधी मंजूर

मुख्याधिकारी योगेश पाटील यांची माहिती

महाबळेश्वर टाईम्स ,✍️

महाबळेश्वर : प्रतिनिधी 



         केंद्र शासनाच्या “भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य २०२५-२६” या महत्त्वपूर्ण योजनेतून महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेला मोठा निधी प्राप्त झाला आहे. नगर विकास विभागामार्फत शहरातील विविध विकासकामांसाठी एकूण ६४ कोटी ६५ लाख २४ हजार ६१६ रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दिली.



विकास कामांच्या निधीबाबत नगर परिषदेमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष सुनिल शिंदे, नगरसेवक नासिर मुलाणी, अफझल सुतार, संतोष शिंदे, रविंद्र कुंभारदरे, संजय जंगम, संतोष आखाडे, राहुल पिसाळ, रोहित ढेबे व नगरसेविका विमलताई पार्टे ,विद्या बावळेकर, पल्लवी कोंढाळकर, संगीता वाडकर, प्रियंका वायदंडे, रेश्मा ढेबे उपस्थित होते.



या मंजूर निधीतून प्रामुख्याने नगरपरिषदेची नवी ओळख निर्माण करणारी प्रशासकीय इमारत आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. मंजूर झालेली प्रमुख कामे खालीलप्रमाणे आहेत:



नूतन प्रशासकीय इमारत: महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे भव्य बांधकाम करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना सर्व प्रशासकीय सेवा एकाच छताखाली आणि आधुनिक सुविधेत उपलब्ध होतील.


 रस्ते काँक्रीटीकरण (तापोळा रोड ते जुना सातारा रोड): तापोळा रोडपासून ससून रोड, जन्नीमाता सोसायटी ते जुना सातारा रोडपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येईल. तसेच पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या कडेला ‘पावसाळी गटर’ (Storm Water Drain) बांधण्यात येणार आहे.


 माखरीया हायस्कूल परिसर विकास: माखरीया हायस्कूल ते तापोळा रोड नगरपरिषद हद्दीपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून, याच मार्गावर एका पुलाचे बांधकामही प्रस्तावित आहे.


 पर्यटन मार्गाचे सक्षमीकरण: पर्यटकांची वर्दळ असलेल्या क्षेत्र महाबळेश्वर रोडवरील आर.आर. हेरिटेज रिसॉर्ट कॉर्नर ते ग्लेनगिरी बंगलो ते लॉडविक पॉईंट रोडपर्यंतच्या रस्त्याचे संपूर्ण काँक्रीटीकरण केले जाणार आहे.


 पर्यटन आणि स्थानिक सोयींना प्राधान्य


महाबळेश्वर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने येथील रस्त्यांची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. काँक्रीटीकरणामुळे रस्त्यांचे आयुष्य वाढणार असून पावसाळ्यात होणारी दुरवस्था थांबणार आहे. या विकासकामांच्या प्रशासकीय मान्यतेमुळे शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण असून, लवकरच या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या सर्व कामांसाठी शासनाच्या नगर विकास विभागाने६४ कोटी ६५ लाख २४ हजार ६१६ रुपयांच्या निधी प्रशासकीय मान्यता दिली आहे. 


 यावेळी नगराध्यक्ष श्री.शिंदे म्हणाले, महाबळेश्वर शहराचा सर्वांगीण विकास होण्याच्या अनुषंगाने अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार ,उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे सहकार्याने व प्रशासनाच्या पाठपुरव्या मुळे हा निधी उपलब्ध झाला आहे.महाबळेश्वर शहरातील नागरिकांच्या वतीने व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आभार व्यक्त  करून या निधीमुळे शहराच्या पायाभूत सुविधामध्ये मोठी वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.



                 बातम्या व जाहिरातीसाठी 

                              संपर्क 

                     संपादक : राहुल शेलार 

                   मो.नं : 9765576377

          कार्यकारी संपादक : रियाज मुजावर 

                   मो.नं :   9403546485