महाबळेश्वर टाईम्स
पाचगणीत राजकारण आणि कलेचा मनमोकळा संवाद; मकरंद आबा पाटील यांची अमीर खान यांना सदिच्छा भेट
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले थंड हवेचे निसर्गरम्य पर्यटनस्थळ पाचगणी सध्या एका खास सदिच्छा भेटीमुळे चर्चेत आले आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मकरंद आबा पाटील यांनी बॉलिवूडचे ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अमीर खान यांच्या पाचगणी येथील निवासस्थानी भेट देत आपुलकीचा संवाद साधला.
या भेटीमुळे राजकीय क्षेत्रातील संवेदनशीलता आणि कला क्षेत्रातील सर्जनशीलता यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. अमीर खान यांचे पाचगणीशी अतूट नाते असून, त्यांचे लग्न याच ठिकाणी झाले आहे. त्यामुळेच ते स्वतःला अभिमानाने ‘पाचगणीकर’ मानतात. चित्रपटसृष्टीतील धावपळीपासून दूर निवांत क्षण घालवण्यासाठी ते अनेकदा पाचगणीतील आपल्या निवासस्थानी येत असतात.
या सदिच्छा भेटीदरम्यान कला, सामाजिक जाणीव, ग्रामीण विकास, तसेच समकालीन सामाजिक प्रश्नांवर दोघांमध्ये सखोल व मनमोकळी चर्चा झाली. समाजकारणात कलेची भूमिका आणि सामाजिक परिवर्तनासाठी सर्जनशीलतेचा वापर यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, तहसीलदार सचिन म्हस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, नियोजन समिती सदस्य प्रवीणशेठ भिलारे, तसेच नवनिर्वाचित नगरसेवक राजेंद्र पारठे व राजेश पारठे यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे ‘लगान’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते अमीन हाजी यांनीही या चर्चेत सहभाग नोंदवला.
मंत्री मकरंद आबा पाटील यांनी अमीर खान यांच्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले. तर अमीर खान यांनी पाचगणीच्या निसर्गरम्य वातावरणाबद्दल आणि येथील लोकांशी असलेल्या ऋणानुबंधांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
ही सदिच्छा भेट भविष्यात कला आणि समाजकारणाच्या दृष्टीने सकारात्मक व फलदायी ठरेल, अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.



Social Plugin