महाबळेश्वर शहरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे भव्य स्वच्छता अभियान
दोन टन कचऱ्याचे संकलन; १६७ श्रीसदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग
महाबळेश्वर(प्रतिनिधी)
ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त, डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा) च्या वतीने महाबळेश्वर शहरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छतादूत पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी, डॉ. सचिन दादा धर्माधिकारी, उमेश दादा धर्माधिकारी आणि राहुल दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम पार पडला.
स्वच्छतेने पालटले शहराचे रूप
रविवारी सकाळी ७:३० ते ११ या वेळेत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत महाबळेश्वर शहरातील सुमारे १.५ कि.मी. अंतराच्या दुतर्फा रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने कोळी आळी, तानु पटेल स्ट्रीट, मरीपेठ रोड तसेच नगरपालिका कार्यालय, तहसीलदार कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालय परिसराचा कायापालट करण्यात आला.
लोकसहभाग आणि श्रमदान
या अभियानात श्री समर्थ बैठकीतील १६७ सदस्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने श्रमदान केले. मोहिमेदरम्यान अंदाजे २ टन ओला व सुका कचरा गोळा करण्यात आला. याप्रप्रसंगी नगरसेवक संतोष (आबा) शिंदे, संजय जंगम, पालिकेचे स्वच्छता निरीक्षक प्रमोद कुंभार आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सामाजिक बांधिलकीचा वारसा
समाजाप्रती असलेले ऋण फेडण्याच्या भावनेतून प्रतिष्ठानतर्फे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. "शारीरिक स्वास्थ्यासाठी स्वच्छता महत्त्वाची असून, अशा मोहिमांमुळे सामाजिक स्वच्छतेसोबतच वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्वही जनमानसात रुजते," अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
प्रतिष्ठानमार्फत केवळ स्वच्छताच नव्हे, तर अंधश्रद्धा निर्मूलन, रक्तदान, वृक्षारोपण, जलपुनर्भरण आणि आरोग्य शिबिरे यांसारख्या अनेक उपक्रमांतून 'माणसाला माणसाशी जोडण्याचे' कार्य निरंतर सुरू आहे. या उपक्रमाचे महाबळेश्वर परिसरातून सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
अमेरिकेत स्वच्छतेचा जागर : डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
मानवतेची सेवा आणि पर्यावरण रक्षण या ध्येयाने प्रेरित होऊन, डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये भव्य स्वच्छता आणि जाणीव जागृती मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली.
पद्मश्री डॉ. श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. अमेरिकेतील कॅलिफोर्निया (ट्रेसी), जॉर्जिया (मिल्टन), नॉर्थ कॅरोलिना (डरहम) आणि टेक्सास (नीडव्हिल व हर्स्ट) यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी 'ॲडॉप्ट ए रोड', 'ॲडॉप्ट ए हायवे' आणि 'ॲडॉप्ट ए पार्क' या माध्यमातून स्वच्छता करण्यात आली.
या मोहिमेत स्थानिक नागरिक आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. केवळ परिसर स्वच्छ करणे इतकाच या मोहिमेचा मर्यादित उद्देश नसून, शाश्वत भविष्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आणि स्वच्छतेचे महत्त्व जनमानसात रुजवणे हा मुख्य विचार यामागे होता. प्रतिष्ठानच्या या जागतिक स्तरावरील प्रयत्नांमुळे अमेरिकेतही स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचला आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485





Social Plugin