महाबळेश्वर शहरातील “कोळी आळी” या ऐतिहासिक व पारंपरिक नावात बदल करू नये नागरिकांचे निवेदन. महाबळेश्वर टाईम्स महाबळेश्वर प्रतिनिधी
निवेदन देताना नगरसेविका निता झाडे व कोळी अळी येथील नागरिकमहाबळेश्वर : शासनाच्या अध्यादेशानुसार राज्यातील विविध शहरांमधील जातीवाचक उल्लेख असलेल्या गल्ल्या, आळ्या, पेठा व मोहल्ल्यांची नावे बदलण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. या अनुषंगाने महाबळेश्वर शहरातील “कोळी आळी” या परिसराच्या नावात बदल करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समजताच कोळी आळी समाज ग्रामस्थ,विर शिवा नाभिक संघटना, चर्मकार समाज तसेच स्थानिक सर्व जाती धर्मीय नागरिकांकडून मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, “कोळी आळी” हे नाव साधारणतः शंभर वर्षांहून अधिक काळापासून प्रचलित आहे. या परिसरात पूर्वापार कोळी समाजाचे वास्तव्य असल्यामुळे ऐतिहासिक वास्तवाच्या आधारे या भागाला “कोळी आळी” हे नाव प्राप्त झाले. कालांतराने हे नाव स्थानिक इतिहासाचा आणि सामाजिक ओळखीचा अविभाज्य भाग बनले आहे.
सदर परिसरात सर्व जाती व धर्मांचे नागरिक अनेक दशकांपासून परस्पर सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याने राहत आहेत. “कोळी आळी” या नावामुळे कधीही सामाजिक तेढ, भेदभाव किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. त्यामुळे हे नाव बदलू नये, अशी ठाम भूमिका स्थानिक नागरिकांनी निवेदनातून मांडली आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, या नावाशी स्थानिक नागरिकांची ऐतिहासिक, सांस्कृतिक व भावनिक नाळ जोडलेली आहे. त्यामुळे नाव बदलण्याचा कोणताही निर्णय नागरिकांच्या भावनांना धक्का देणारा ठरू शकतो.
प्रशासकीय व लोकप्रतिनिधित्वाची बाब....
नुकत्याच पार पडलेल्या महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीत संबंधित प्रभाग कोळी समाजासाठी आरक्षित करण्यात आला होता. त्यामुळे या भागाचा त्या समाजाशी असलेला ऐतिहासिक व सामाजिक संबंध अधिक स्पष्ट होतो.
वरील सर्व बाबींचा विचार करून “कोळी आळी” या ऐतिहासिक व पारंपरिक नावामध्ये कोणताही बदल न करता ते नाव जैसे थे कायम ठेवण्यात यावे, अशी नम्र परंतु ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक नागरिक, सामाजिक प्रतिनिधी व संबंधित घटक यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात यावा, अशीही विनंती करण्यात आली आहे.



Social Plugin