*महाबळेश्वर: १५ वर्षे उलटली तरी नळ कनेक्शन मिळेना;*
*लिंगमळा, रांजणवाडी परिसरातील समस्यांबाबत नगरसेविका विद्याताई बावळेकर आक्रमक*
महाबळेश्वर: लिंगमळा आणि परिसरातील नागरिकांना गेल्या दीड दशकापासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. सन २०११ मध्ये टाकलेली पाईपलाईन अद्याप कार्यान्वित न झाल्याने आणि अनेक भागात ती गायब असल्याने, याप्रकरणी नगरसेविका विद्याताई बावळेकर यांनी सर्वसाधारण सभेत (GB) आक्रमक पवित्रा घेत तातडीने नवीन नळ कनेक्शन देण्याची मागणी केली आहे.
*पाणी पुरवठ्याचा बोजवारा: जुनी पाईपलाईन कागदावरच*
मिळालेल्या माहितीनुसार, २०११ मध्ये नगरपालिकेने पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकली होती. मात्र, अनेक वर्षे होऊनही नवीन कनेक्शन जोडणी झाली नाही. २०१६ मध्ये ही लाईन 'चार्ज' करण्यात आली, परंतु ती लिंगमळा परिसरापर्यंत पोहोचलीच नाही. विशेष म्हणजे, स्थानिक नागरिकांनी २०१६ मध्येच नवीन कनेक्शनसाठी अर्ज केले होते, पण १५ वर्षे उलटूनही प्रशासन केवळ चालढकल करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
*श्रीमती बावळेकर यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे*
पाईपलाईन गायब: पूर्वीची ३/२ इंची पाईपलाईन अनेक ठिकाणी गायब असून, त्याऐवजी आता नवीन क्षमतेची ४/२ इंची पाईपलाईन टाकण्यात यावी.
थकीत कनेक्शन: २०१६ पासून प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढून तातडीने नळ जोडणी द्यावी.
सांडपाणी व्यवस्था आणि स्वच्छतेवर भर
रांजणवाडी आणि गादरवाडी परिसरातील सांडपाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. यावर उपाय म्हणून:
रांजणवाडी STP प्लांटची क्षमता वाढवण्यात यावी.
गादरवाडी येथे नवीन STP प्लांट बसवून सांडपाण्यावर प्रक्रिया करावी, जेणेकरून प्रदूषण रोखता येईल.
*नागरी सुविधांसाठी मागणीचा रेटा*
केवळ पाणी आणि सांडपाणीच नव्हे, तर लिंगमळा, पेटीत रोड, गादरवाडी आणि रांजणवाडी या भागातील मूलभूत सुविधांकडेही विद्याताई बावळेकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी खालील मागण्या मांडल्या:
ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा: या चारही भागांतील मुख्य ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी बाकडी (बेंच) बसवावेत. रस्ते आणि प्रकाश व्यवस्था: गल्लीबोळांमधील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करावे आणि नादुरुस्त पथदिवे बदलून अत्याधुनिक लाईट व्यवस्था कार्यान्वित करावी.
*आमचा आवाज दाबू नका'; नगर पालिकेत महिला नगरसेविका आक्रमक*
नगर पालिकेच्यासभेत अनुभवी आणि पुरुष नगरसेवकांकडून होणाऱ्या सततच्या हस्तक्षेपामुळे महिला नगरसेविकांनी तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. "महिला नगरसेविका अभ्यासाने बोलत असताना त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका," अशा शब्दांत नगरसेविका विद्या बावळेकर यांनी पुरुष सदस्यांना चांगलेच सुनावले.
सभेचे कामकाज सुरू असताना अनेकदा महिला सदस्यांना बोलण्यापासून रोखले जाते किंवा त्यांच्या मुद्द्यांमध्ये अडथळा आणला जातो, असा अनुभव वारंवार येत असल्याचे बावळेकर यांनी निदर्शनास आणून दिले. त्यांनी ठाम भूमिका मांडताना सांगितले की, "सभेत महिलांचा आदर राखा आणि आम्हालाही आमची मते मांडण्याची पुरेशी संधी द्या.विद्याताई बावळेकर यांच्या या भूमिकेला सभागृहातील सर्वच महिला सदस्यांनी एकजुटीने पाठिंबा दर्शवला.
नगरपालिकेच्या आगामी काळात या मागण्यांवर प्रशासन काय पावले उचलते, याकडे संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Social Plugin