Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरच्या विविध समस्यांकडे अपक्ष नगरसेविका स्मिता पाटील यांचे लक्षवेध

 महाबळेश्वरच्या विविध समस्यांकडे अपक्ष नगरसेविका स्मिता पाटील यांचे लक्षवेध


सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष सुनील शिंदे व मुख्याधिकारी योगेश पाटील यांना लेखी निवेदन

महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर 

महाबळेश्वर नगरपरिषद सभागृहात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत पहिल्यांदाच अपक्ष  निवडून आलेल्या नगरसेविका स्मिता सुनील पाटील यांनी महाबळेश्वर शहरातील विविध समस्यांसह पर्यटन नगरीच्या शाश्वत व पारदर्शक विकासासाठी महत्त्वाच्या मुद्द्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

पहिल्याच सभेत त्यांनी अनेक विषयांवर आपली मते मांडत नगराध्यक्ष सुनील शिंदे व मुख्याधिकारी योगेश पाटील यांना लेखी निवेदने सादर केली.

महाबळेश्वर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थापन, टोल व प्रदूषण कर वसुली, पार्किंग व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP), रस्ते कामांची गुणवत्ता, पथदिवे प्रकल्प तसेच काँक्रीट रस्त्यांमुळे भूजल पातळीवर होणारा परिणाम या महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी प्रशासनाकडे लेखी माहिती मागवली असून काही सुधारणा देखील सुचवल्या आहेत.

पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, महाबळेश्वर हे पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्र असून पर्यटनावर आधारित येथील स्थानिकांचा व्यवसाय आहे. त्यामुळे विकासकामे पारदर्शक, दर्जेदार आणि पर्यावरणपूरक पद्धतीने होणे आवश्यक आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, महाबळेश्वरचा विकास हा नागरिकांच्या सोयीचा, पर्यावरणाचा सन्मान करणारा आणि नगरपरिषदेची आर्थिक स्थिती मजबूत करणारा असावा. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम केल्यास शहराचा सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो.

पर्यटनस्थळाच्या विकासासाठी सकारात्मक व बांधिलकीने काम करण्याचा आपला प्रयत्न कायम राहील, असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, केवळ विरोधाला विरोध न करता शहराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच माझ्या प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सत्ताधारी गटाकडून जे प्रयत्न केले जातील त्यांना माझे समर्थन असेल.

दरम्यान, महाबळेश्वर बाजारपेठेत येणाऱ्या पर्यटकांसाठी स्वच्छतागृहांची कमतरता ही गंभीर समस्या असल्याचे त्यांनी सभेत निदर्शनास आणून दिले. सध्या उपलब्ध स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय असून त्यामुळे पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. विशेषतः महिला पर्यटकांची स्वच्छतागृहांअभावी मोठी कुचंबणा होत असल्याने पालिकेने ‘पिंक टॉयलेट’ संकल्पना राबवावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

या पिंक टॉयलेटमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन, नॅपकिन नष्ट करण्यासाठी इन्सिनरेटर तसेच लहान मुलांसाठी फीडिंग रूम अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली.



बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क


       संपादक :- राहुल शेलार 


       📱 9765576377


  कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 


       📱 9403546 485