Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

अंबरग्रीस तस्करीचा पर्दाफाश; ५.३०० किलो ‘व्हेल माशाची उलटी’ जप्त, सात जण ताब्यात

 अंबरग्रीस तस्करीचा पर्दाफाश; ५.३०० किलो ‘व्हेल माशाची उलटी’ जप्त, सात जण ताब्या

महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर(संदेश भिसे)




आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधी रुपयांची किंमत असलेल्या अंबरग्रीस (व्हेल माशाची उलटी) तस्करीचा मोठा प्रकार सातारा वनविभागाने उघडकीस आणला आहे. महाबळेश्वर परिसरात सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे ५.३०० किलो अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) सातारा, वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर व संरक्षण पथकाने संयुक्त कारवाई केली. महाबळेश्वर परिसरात संशयितांच्या हालचालीवर लक्ष ठेवून सापळा रचण्यात आला.


कारवाईदरम्यान Ertiga (MH-43-BK-9663), Swift (MH-04-FR-0430) आणि Tata Nexon (MH-07-EJ-6008) या वाहनांची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान वाहनांमधून मोठ्या प्रमाणात अंबरग्रीस आढळून आले.


ताब्यात घेतलेले आरोपी

या प्रकरणी खालील सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे –

अतुल अशोक विश्वासराव (रा. ठाणे)

आकाश श्यामसुंदर धुरी (रा. मालवण)

एव्हन्स क्लेमेंट फर्नांडिस (रा. मालवण)

हितेंद्र मनोहर शेठे (रा. लालबाग, परळ)

कौस्तुभ मिलिंद प्रभू (रा. धनकवडी, पुणे)

मोहन हरिभाऊ पाटील (रा. भांडुप, ठाणे)

विल्सन झुजे फर्नांडिस (रा. मालवण)

वनविभागाच्या प्राथमिक माहितीनुसार जप्त केलेले अंबरग्रीस हे दुर्मिळ प्रजातीच्या Sperm Whale (Physeter microcephalus) या व्हेल माशाशी संबंधित असल्याचे सांगितले आहे.


कायदेशीर कारवाई

वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत अंबरग्रीसची विक्री, खरेदी, साठवण किंवा वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा आहे. दोषी आढळल्यास सात वर्षांपर्यंत कारावास आणि मोठ्या दंडाची तरतूद आहे.

या प्रकरणी वनगुन्हा क्रमांक १/२०२६ दाखल करण्यात आला असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते करीत आहेत.


अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

ही कारवाई अमोल सातपुते, उपवनसंरक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये प्रदीप रौंधळ (सहाय्यक वनसंरक्षक, वनीकरण, सातारा), महादेव मोहिते (वनपरिक्षेत्र अधिकारी, महाबळेश्वर), गणेश महांगडे (वनपरिक्षेत्र अधिकारी, संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन, सातारा), सुनील लांडगे (वनपाल, महाबळेश्वर), तुकाराम निकम (वनरक्षक, तळदेव), बाबू मराडे (वनरक्षक, मांघर), देवेंद्र पोवार (वनरक्षक, हारोशी), लहू  राऊत (वनरक्ष मेट तळे), अविनाश गवळी (वनरक्षक, शिरवली) तसेच इतर वन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


   दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंबरग्रीसला मोठी मागणी असल्याने कोकण व किनारपट्टी भागातून तस्करी होत असल्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे. या कारवाईमुळे अंबरग्रीस तस्करीच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क


      संपादक :- राहुल शेलार

             📱 9765576377


कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 

             📱 9403546 485