Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात महाबळेश्वरकरांचा एल्गार; ८ मार्च रोजी 'महाबळेश्वर बंद'ची हाक*

 *रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात महाबळेश्वरकरांचा एल्गार; ८ मार्च रोजी 'महाबळेश्वर बंद'ची हाक*



महाबळेश्वर: सुरूर-वाई-पाचगणी-महाबळेश्वर-पोलादपूर या मुख्य महामार्गाच्या रखडलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांचे प्रचंड हाल होत आहेत. वारंवार तक्रार करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने, आज झालेल्या गाव सभेत 'आम्ही महाबळेश्वरकर' यांच्या वतीने येत्या रविवार, ८ मार्च रोजी महाबळेश्वर शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.

*नेमके प्रकरण काय*

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरूर ते पोलादपूर या दरम्यानच्या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यातच जे काम झाले आहे, त्याचा दर्जा अत्यंत सुमार असल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याचा थेट फटका महाबळेश्वरच्या मुख्य उत्पन्नाचे साधन असलेल्या पर्यटनाला बसत आहे. पर्यटकांना प्रवासासाठी तासनतास वाहतूक कोंडीत अडकावे लागत असून, खराब रस्त्यांमुळे वाहनांचेही नुकसान होत आहे.

*गाव सभेचा आक्रमक पवित्रा*

आज महाबळेश्वर येथे झालेल्या महत्त्वपूर्ण गाव सभेत सर्व स्तरांतील नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत प्रशासनाच्या संथ कारभाराचा तीव्र निषेध करण्यात आला. "जोपर्यंत शासन आणि प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील," असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.


 

*शहर बंद:*  रविवारी शहरातील सर्व बाजारपेठा आणि व्यवहार बंद राहतील. सहभागाचे आवाहन: स्थानिक व्यापारी, टॅक्सी संघटना, हॉटेल व्यावसायिक, घोडे व्यवसायिक ,आणि सर्व घटकांना या बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

   उद्देशझोपलेल्या प्रशासनाला जागे करणे आणि पर्यटकांसह स्थानिकांची या त्रासातून सुटका करणे. "रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटनावर विपरीत परिणाम होत आहे. हे केवळ रस्त्याचे काम नसून महाबळेश्वरच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे."

 

*पर्यटकांना आवाहन*

रविवार हा पर्यटनाचा मुख्य दिवस असतानाही केवळ जनहितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनामुळे पर्यटकांची गैरसोय होण्याची शक्यता असली, तरी भविष्यातील सुकर प्रवासासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केले आहे.