Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

*महाबळेश्वर पंचायत समितीची मासिक सभा उत्साहात संपन्न; नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन आणि विकासकामांचा आढावा*

*महाबळेश्वर पंचायत समितीची मासिक सभा उत्साहात संपन्न; नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन आणि विकासकामांचा आढावा* 

महाबळेश्वर टाईम्स 

​महाबळेश्वर | प्रतिनिधी


महाबळेश्वर पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा आज, शुक्रवार दिनांक २७ मार्च २०२६ रोजी के. एम. आर. भिलारे सभागृहात सभापती सौ. शकुंतला रमेश चोरमले यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेमध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या अभिनंदनासह तालुक्यातील विविध विकासकामांचा आणि पाणीटंचाईचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


​सभेच्या सुरुवातीला गट विकास अधिकारी  विजय विभुते यांनी प्रशासनाच्या वतीने सर्वांचे स्वागत केले. सौ. शकुंतला चोरमले यांची सभापतीपदी आणि श्री. संजय मोरे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पंचायत समिती सदस्या सौ. वंदना भिलारे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला, ज्याला श्री. संजय शेलार यांनी अनुमोदन दिले.


​सभेमध्ये विविध विभागांच्या कामकाजावर सविस्तर चर्चा करण्यात आली


​बांधकाम व पाणीपुरवठा: बांधकाम विभागाने प्राप्त अनुदान आणि पूर्ण/अपूर्ण कामांची माहिती दिली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने 'जलजीवन मिशन' अंतर्गत गावनिहाय कामांचा अहवाल सादर केला.


​पाणीटंचाई निवारण: ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे, तिथे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करावे, अशा सूचना देण्यात आल्या.


​शिक्षण व आरोग्य: शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आरोग्य विभागाने 'मंत्रण' कार्यक्रमात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.


​पशुसंवर्धन: या विभागाने राबविलेल्या योजनांबाबत पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक निरसन करण्यात आले.

​सभापती सौ. शकुंतला चोरमले आणि उपसभापती श्री. संजय मोरे यांनी सर्व खातेप्रमुखांना "जनतेच्या हिताच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य देऊन काम करा" असे निर्देश दिले. गट विकास अधिकारी श्री. विजय विभुते यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक कामकाज करण्याची ग्वाही दिली.

​या सभेमध्ये सहाय्यक ग.वि.अ. श्री. रामचंद्र जगताप यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. सभेचे कामकाज पाहण्यासाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. प्रभाकर शेंडे, श्री. दिनकर जाधव आणि वरिष्ठ सहाय्यक श्री. श्रीकांत धनवडे यांनी सहकार्य केले. शेवटी कृषी विस्तार अधिकारी श्री. रमेश ओव्हाळ यांनी सर्वांचे आभार मानले आणि सभापतींच्या परवानगीने सभा संपन्न झाली.