Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरमध्ये खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी उघड; डोंबिवलीच्या आरोपीला वनविभागाकडून अटक

 महाबळेश्वरमध्ये खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी उघड; डोंबिवलीच्या आरोपीला वनविभागाकडून अटक.....


महाबळेश्वर टाईम्स 
महाबळेश्वर | प्रतिनिधी

महाबळेश्वर येथील बसस्थानक परिसरात वनविभागाने सापळा रचून वन्यप्राणी खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एका इसमाला रंगेहात पकडले. या कारवाईत ५.९८० किलो वजनाचे खवले जप्त करण्यात आले असून, आरोपीला न्यायालयाने २३ एप्रिलपर्यंत वन कोठडी सुनावली आहे.

​मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, चिपळूणहून बसने प्रवास करून खवले मांजराचे खवले विक्रीसाठी महाबळेश्वरमध्ये एक व्यक्ती येणार असल्याची खबर वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनपरिमंडळ अधिकारी श्री. सुनील लांडगे व त्यांच्या पथकाने १८ एप्रिल २०२६ रोजी बसस्थानक परिसरात सापळा रचला. यावेळी संशयास्पदरित्या वावरणाऱ्या प्रसाद तुकाराम गोसावी (रा. मानपाडा, डोंबिवली) याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे खवले मांजराचे सुमारे ६ किलो खवले मिळून आले.

कायदेशीर कारवाई

​वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या अनुसूची १ मध्ये खवले मांजराचा समावेश आहे. या प्राण्याची शिकार किंवा अवयवांची विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणी वनपरिमंडळ अधिकारी महाबळेश्वर यांनी प्र.गु.रि.क्र. ०४/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून, दि. १९ एप्रिल रोजी त्याला महाबळेश्वरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला २३/०४/२०२६ पर्यंत (४ दिवस) वनकोठडी सुनावली आहे.


​ही धडक कारवाई सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. अमोल सातपुते (भा.व.से.), सहा. वनसंरक्षक श्री. प्रदीप रॉधळ, सहा. वनसंरक्षक श्री. दिगंबर जाधव, आणि वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकामध्ये वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे, वनरक्षक बा.भ.मराडे, तुकाराम निकम, संतोष काळे, विशाल जाधव, समीर उतेकर आणि गणेश वागदरे यांचा समावेश होता.

वनविभागाचे आवाहन

​"अवैध शिकार किंवा वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. यामध्ये ३ ते ७ वर्षांपर्यंत कारावास आणि २५,००० रुपये दंडाची तरतूद आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध कृत्यांची माहिती वनविभागाला देऊन सहकार्य करावे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल."

— वनविभाग, महाबळेश्वर

              बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                      संपादक :- राहुल शेलार 

                    📱 9765576377

              कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 

                    📱 9403546 485