Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरचा श्वास गुदमरतोय! 'इको-सेन्सिटिव्ह झोन'मध्ये प्रशासकीय आशीर्वादाने निसर्गाचे धिंडवडे

 महाबळेश्वरचा श्वास गुदमरतोय! 'इको-सेन्सिटिव्ह झोन'मध्ये प्रशासकीय आशीर्वादाने निसर्गाचे धिंडवडे

मेटतळे येथे पत्र्यांच्या आडोशाने दाट वृक्षराईवर कुऱ्हाड; धनिक मिळकतदारावर महसूल विभागाची मेहेरबानी का?


महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर (प्रतिनिधी)



निसर्गाचा अनमोल ठेवा आणि केंद्र सरकारकडून 'पर्यावरण संवेदनशील क्षेत्र' (Eco-Sensitive Zone) म्हणून घोषित असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात सध्या कायद्याचे नाही, तर धनदांडग्यांचे राज्य सुरू असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. तालुक्यातील मौजे मेटतळे येथे एका खाजगी मिळकतदाराने प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून पर्यावरणाचा गळा घोटला असून, या विरोधात सामाजिक कार्यकर्ते श्री. सूर्यकांत मारुती पांचाळ यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

*पत्रा लावला आणि निसर्ग संपवला!*

महाबळेश्वर-पोलादपूर मुख्य रस्त्यालगत मेटतळे गावच्या हद्दीत श्री. खोसला यांच्या मिळकतीमध्ये हा प्रकार घडला आहे. रस्त्यावरून आत काय सुरू आहे हे दिसू नये, यासाठी अत्यंत चलाखीने उंच पत्रे लावून संपूर्ण परिसर बंदिस्त करण्यात आला. या पत्र्यांच्या आडोशाने गेल्या काही दिवसांपासून निसर्गावर घाला घातला जात होता. येथील दाट आणि पुरातन वृक्षराई मुळासकट उखडून टाकण्यात आली असून, मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन करून जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले आहे. 'इको-सेन्सिटिव्ह' क्षेत्रात साधी दगड-माती हलवण्यासाठी कडक नियमावली असताना, येथे चक्क डोंगर पोखरून सपाटीकरण करण्यापर्यंत मिळकतदाराची मजल गेली आहे.

*प्रशासनाची भूमिका: 'कुंपणानेच शेत खाल्ले'*

या संपूर्ण प्रकरणात स्थानिक महसूल यंत्रणेची भूमिका संशयाच्या भोऱ्यात अडकली आहे. जेव्हा उत्खनन सुरू होते आणि वृक्षतोड होत होती, तेव्हा स्थानिक तलाठी, मंडल अधिकारी आणि ग्रामसेवक नेमके कोणाच्या आशीर्वादाने गप्प होते? असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, पर्यावरणाचे नुकसान पूर्ण झाल्यावर महसूल विभागाने केवळ 'पंचनामा' करण्याचा फार्स उरकला.

"जेव्हा काम थांबवून जेसीबी आणि इतर यंत्रसामग्री जप्त करणे आवश्यक होते, तेव्हा अधिकारी डोळे मिटून बसले होते. हा प्रकार म्हणजे 'कुंपणानेच शेत खाण्याचा' आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया श्री. पांचाळ यांनी व्यक्त केली आहे.

 


पर्यावरण रक्षणार्थ आक्रमक पवित्रा घेत श्री. सूर्यकांत पांचाळ यांनी विभागीय आयुक्त तथा अध्यक्ष, शासकीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती, पुणे यांच्याकडे लेखी तक्रार करून खालील मागण्या केल्या आहेत:

संबंधित मिळकतदारावर तातडीने फौजदारी गुन्हा (FIR) दाखल व्हावा. सदर मिळकतीच्या ७/१२ उताऱ्यावर 'बेकायदेशीर उत्खनन' अशी नोंद करून कोणत्याही बांधकामास कायमस्वरूपी बंदी घालावी.कर्तव्यात कसूर करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक व मंडल अधिकाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी. महाबळेश्वरमध्ये 'उंच पत्रे' लावून आडोशाने सुरू असलेल्या सर्व कामांची तातडीने चौकशी व्हावी.

*आता लक्ष विभागीय आयुक्तांच्या कारवाईकडे*

धनिक मिळकतदार नाममात्र दंड भरून निसर्गाचा विनाश करतात आणि आपले उखळ पांढरे करून घेतात. मात्र, महाबळेश्वरचा हा नैसर्गिक वारसा वाचवण्यासाठी केवळ दंड पुरेसा नसून कठोर फौजदारी कारवाईची गरज आहे. जर प्रशासनाने यावर ठोस पावले उचलली नाहीत, तर तहसीलदार कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्री. पांचाळ यांनी दिला आहे.

आता या "प्रशासकीय आशीर्वादाने" सुरू असलेल्या निसर्ग संहारावर विभागीय आयुक्त लगाम लावणार का? याकडे संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.


                     बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                             संपादक :- राहुल शेलार 

                                 📱 9765576377

              कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 

                                📱 9403546 485