*वेण्णा लेकवर फ्लोटिंग जेट्टी,* *महात्मा बसवेश्वर चौक सुशोभीकरण * पेटीट लायब्ररीचा कायापालट*
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर (प्रतिनिधी):
जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वरच्या सौंदर्यात आणि पर्यटन सुविधांमध्ये आणखी भर पडली आहे. महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने शहरात राबविण्यात आलेल्या विविध महत्त्वाकांक्षी विकासकामांचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यामुळे महाबळेश्वरच्या पर्यटनाला नवी झळाळी मिळणार असून, शहराच्या ऐतिहासिक आणि आधुनिक वैभवाचा संगम या प्रकल्पांमधून दिसून येत आहे.
*लोकार्पित करण्यात आलेले* *प्रमुख प्रकल्प:*
क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर महाराज चौक: माखरीया उद्यान परिसरातील या चौकाचे भव्य सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामुळे परिसराच्या सौंदर्यात मोठी भर पडली असून पर्यटकांचे हे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
ऐतिहासिक पेटीट लायब्ररीचा जिर्णोद्धार: नगरपरिषदेच्या मालकीच्या या ऐतिहासिक वास्तूचे जुने वैभव जपून तिचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. लायब्ररीच्या बाहेरील मोकळ्या जागेचेही सुशोभीकरण झाल्याने ही वास्तू आता नव्या स्वरूपात पर्यटकांच्या सेवेत रुजू झाली आहे.
वेण्णा लेक फ्लोटिंग जेट्टी: पर्यटकांचे आवडते केंद्र असलेल्या वेण्णा लेक बोट क्लब येथे अद्ययावत 'फ्लोटिंग जेट्टी' बसवण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांचा नौकाविहाराचा अनुभव अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे.
शाश्वत विकासाचा ध्यास - मकरंद पाटील
याप्रसंगी बोलताना मंत्री मकरंद पाटील यांनी नगरपरिषदेच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, महाबळेश्वरचे ऐतिहासिक महत्त्व टिकवून ठेवत शहराचा आधुनिक विकास करणे ही काळाची गरज आहे. नगरपरिषदेने निर्माण केलेल्या या सुविधांमुळे पर्यटनाला निश्चितच मोठी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष सुनील शिंदे, उपनगराध्यक्ष नासिर मुलाणी, पंचायत समिती सभापती सौ शंकुतला चोरमले मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्यासह नगरसेवक संजय जंगम, अफझल सुतार, रोहित ढेबे, संतोष शिंदे, राहुल पिसाळ, रविंद्र कुंभारदरे, संतोष आखाडे, किसन शिंदे आणि नगरसेविका विमलताई पार्टे, संगीता वाडकर, विद्या बावळेकर, पल्लवी कोंढळकर, प्रियंका वायदंडे, रेश्मा ढेबे, स्मिता पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.




Social Plugin