श्रीक्षेत्र महाबळेश्वर: पर्यटनाचे ‘प्रवेशद्वार’ की नियोजनाचा अभाव
लाखो पर्यटकांची पसंती, पण सुविधांच्या नावाने आनंदीआनंद; प्रशासकीय उदासीनतेचा फटका*
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर | प्रतिनिधी
निसर्गसौंदर्याने नटलेले आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले श्रीक्षेत्र महाबळेश्वर हे थंड हवेच्या ठिकाणाचे प्रमुख केंद्र मानले जाते. महाबळेश्वरला भेट देणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी तब्बल ९० टक्के पर्यटक या पवित्र स्थळाला आवर्जून भेट देतात. मात्र, सध्या या पर्यटन स्थळाची अवस्था 'नाव मोठे आणि लक्षण खोटे' अशी झाली आहे. मूलभूत सुविधांचा अभाव आणि कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे श्रीक्षेत्र महाबळेश्वर हे पर्यटनाचे प्रवेशद्वार ठरण्याऐवजी व्यवस्थेचे अपयश ठरत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.
येथे येणाऱ्या वाहनांच्या संख्येच्या तुलनेत वाहनतळाची (पार्किंग) क्षमता अत्यंत तोकडी आहे. परिणामी, अरुंद रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडल्यामुळे पर्यटकांचा मौल्यवान वेळ वाया जात असून, याचा त्रास स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनाही सहन करावा लागत आहे. "देवाला दर्शनासाठी येतो की वाहतूक कोंडीत अडकायला असा संतप्त सवाल पर्यटकांकडून विचारला जात आहे.
जगाच्या नकाशावर नाव असलेल्या या स्थळावर प्राथमिक सुविधांचीही वानवा आहे.
महिला आणि वृद्ध पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था नाही.
नवीन येणाऱ्या पर्यटकांना माहिती देण्यासाठी अधिकृत केंद्राचा अभाव आहे.
"इतर पर्यटन स्थळे पर्यटकांना खेचण्यासाठी कोट्यवधींची गुंतवणूक करत असताना, महाबळेश्वरसारख्या सिद्ध देवस्थान आणि निसर्गरम्य ठिकाणी साधी पार्किंगची सोय नसावी, हे दुर्दैवी आहे. याचा परिणाम भविष्यात पर्यटकांच्या संख्येवर नक्कीच होईल.
— एक त्रस्त पर्यटकदरवर्षी पर्यटनातून मोठा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा होतो, परंतु श्रीक्षेत्र महाबळेश्वरच्या विकासासाठी तो खर्च का होत नाही? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने केवळ बैठका आणि आश्वासने न देता प्रत्यक्ष जमिनीवर काम करण्याची गरज आहे.
श्रीक्षेत्र महाबळेश्वरचा ऐतिहासिक सन्मान टिकवायचा असेल आणि स्थानिकांच्या रोजगाराचे रक्षण करायचे असेल, तर आता ठोस अंमलबजावणीची वेळ आली आहे. जर लवकरच सुविधांमध्ये सुधारणा झाली नाही, तर पर्यटकांची पावले या क्षेत्राकडे वळणे कमी होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.



Social Plugin