महाबळेश्वरच्या वाहतूक कोंडीवर नगरसेवक रस्त्यावर; पोलिसांसोबत वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर,(संदेश भिसे)
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर येथे उन्हाळी पर्यटन हंगामामुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असून, शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत असून, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे.
महाबळेश्वरहून तापोळा येथे जाण्यासाठी हा एकमेव मध्यवर्ती मार्ग असल्याने या चौकात दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. वाढती गर्दी आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता नगरसेवक ॲड. संजय जंगम तसेच शिवसेना शहर प्रमुख विजय नायडू यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पोलिस प्रशासनासोबत वाहतूक नियंत्रणाची धुरा सांभाळली.
वाहनचालकांना योग्य मार्गदर्शन करत वाहतूक शिस्तबद्ध ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अचानक वाढलेल्या गर्दीत नागरिक आणि पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार विशेष कौतुकास्पद ठरला. त्यांच्या या कृतीमुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.
दरम्यान, पर्यटन हंगामात शहरातील वाढती वाहनसंख्या लक्षात घेता प्रमुख चौकांमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त, प्रभावी वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था आणि पर्यायी मार्गांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin