Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर नगरपालिका, पोलीस प्रशासन, सावर्जनिक बांधकाम व महावितरण विभागाची संयुक्त बैठक; शहरातील रस्ते, वाहतूक कोंडी आणि नागरी समस्यांवर होणार तातडीने उपाय योजना

 महाबळेश्वर नगरपालिका, पोलीस प्रशासन, सावर्जनिक बांधकाम  व महावितरण विभागाची संयुक्त बैठक; शहरातील रस्ते, वाहतूक कोंडी आणि नागरी समस्यांवर होणार तातडीने उपाय योजना



​महाबळेश्वर टाईम्स                                                  महाबळेश्वर प्रतिनिधी 

पर्यटन हंगाम आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर शहरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि वीज पुरवठा यांसारख्या विविध गंभीर समस्यांवर पालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम (सा.बा.) विभाग, महावितरण ॲक्शन मोडमध्ये आले आहे. नगराध्यक्ष ,नगरसेवक यांनी मांडलेल्या विविध तक्रारींची दखल घेत प्रशासनाने तातडीने कामांचे नियोजन केले आहे.

​शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

​खड्डेमुक्ती व दुरुस्ती: बसवेश्वर  चौकातील रस्ता, पोलादपूर रोड, महाड रोड आणि  रोडवरील खड्डे तातडीने बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

​गटार व जाळीचे काम: रस्त्यांच्या कडेला असलेल्या गटारांवरील दगडांचे काम पूर्ण करणे, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने गटारांवर 'हेवी स्ट्रेंथ' (उच्च क्षमतेच्या) जाळ्या बसविण्याचा निर्णय नगराध्यक्षानी घेतला आहे.

​मरीपेठ  रोडवरील गटारांचे  नवीन डिझाईन मागविण्यात आले असून, त्यानुसार पुढील काम केले जाईल.

​सर्व विकासकामांचे 'टेंडर प्रोजेक्ट' लवकरात लवकर मंजूर करून कामे सुरू केली जातील.

 वेण्णा लेक आणि नदीपात्रातील गाळ उपसा

​पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जलस्रोतांची स्वच्छता केली जाणार आहे.

​वेण्णा लेक रोड परिसर नदीपात्रामध्ये साठलेली माती व गाळ काढण्याची मागणी स्थानिक नगरसेविकांनी केली असून, त्यानुसार गाळ काढण्याचे काम हाती घेतले जाईल.

​ वेण्णा लेकच्या आजूबाजूच्या परिसरात सोलर एनर्जी (सौर ऊर्जा) यंत्रणा बसवून त्याचे सबस्टेशन उभारण्याबाबत हालचाली सुरू आहेत.

​हॉलिडे होम परिसर: रेल्वे हॉलिडे होम येथील साचलेली माती देखील तातडीने हटवण्यात येणार आहे.

​शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.  महाड रोडवरील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेली सर्व अनधिकृत अतिक्रमणे तातडीने काढण्याचे आदेश नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांनी  अँड. संतोष जंगम व इतर नगरसेवकांच्या मागणीनंतर देण्यात आले आहेत.

​अपघातांना निमंत्रण: केदार हॉटेलजवळ केलेल्या धोकादायक खोदकामामुळे अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संबंधित ठेकेदारावर तातडीने कारवाई करण्याचे संकेत नगरपालिका प्रशासनाने दिले आहेत.


​पर्यटन हंगामात महाबळेश्वर शहराचा श्वास रोखणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक शाखेच्या मदतीने नवीन नियमावली लागू केली जात आहे.

​ डॉ. साबणे रोड येथील ए पी जी अबुल कलाम व्यापारी संकुला समोरील आणि महाड रोड कॉर्नरपर्यंतची पार्किंग पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. या भागात 'नो-पार्किंग'चे बोर्ड लावले जातील आणि लावलेले बेकायदेशीर बॅरिकेडिंग काढले जाईल.

​ आराम चौक आणि साबणे रोड परिसरात चुकीच्या पद्धतीने येणाऱ्या गाड्यांना अटकाव केला जाईल. 'नो-एन्ट्री'मध्ये घुसणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

​सुभाष चौकातील पूनम हॉटेलसमोरील रस्त्यावरील बॅरिकेडिंग हटवून येथील पार्किंग पूर्णपणे बंद करण्यात येईल.

 शहरात येणाऱ्या मालवाहू गाड्यांच्या वेळेचे कडक नियोजन केले जाईल. बाजारपेठेत मालाची चढ-उतार केवळ ठराविक वेळेतच (ऑफ-पिक अव्हर्समध्ये) करावी लागेल.

​ गिरीविहार हॉटेल आणि आठवडे मंगळवार बाजार भागात होणारी बेशिस्त पार्किंग थांबवून तेथे दंडात्मक कारवाईचे फलक लावले जातील.

​ महाबळेश्वर ते मेढा रोडच्या शेवटी वाहनांच्या सुरक्षेसाठी 'रिफ्लेक्टर' लावण्याबाबत संबंधित विभागाला अधिकृत पत्र दिले जाणार आहे.

​उन्हाळा आणि पर्यटन हंगामात वीज जाण्याच्या तक्रारींवर महावितरणकडून दुरुस्ती कामे हाती घेतली जात आहेत.

​लाईन शिफ्टिंग: दि. २०/०५/२०२६ रोजी महाड रोडच्या मुख्य विद्युत लाईनचे काम केले जाणार आहे. तसेच पोलीस स्टेशन परिसरातील लाईट वायरिंग शिफ्ट करण्याचे नियोजन आहे. डॉ. साबणे रोड, मरीपेठ रोड आणि महाड रोडवरील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत चर्चा झाली.

ट्रान्सफॉर्मर व मीटर तपासणी:  नगरपरिषद कार्यालय, समाज मंदिर आणि  येथील पेटीट लायब्ररी येथील दिव्यांवरील मीटरचे 'टॅरिफ चार्ज' तपासले जातील. तसेच वारंवार वीज खंडित होण्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली

महाबळेश्वर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि पर्यटकांसह स्थानिकांना दिलासा देण्यासाठी पालिका प्रशासन कटिबद्ध असून, नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपालिका प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.                                                      या वेळी नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील,  पोलीस उपनिरक्षक रुपाली  काळे, महावितरण  चे रेड्डी साहेब,नगरसेवक अफजल भाई सुतार, संजय जंगम,राजुभाई नालबंद, संतोष आखाडे, रोहित ढेबे, नगरसेविका विमलताई पार्टे, पल्लवी कोंढाळकर, विद्या बावळेकर, स्मिता पाटील, प्रियांका वायदंडे  मुख्यलिपिक बबन जाधव, बांधकाम अभियंता मुरलीधर धायगुडे, वैभव भिलारे टॅक्सी युनियनचे  पदाधिकारी उपस्थित होते