महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा; पाचगणी दांडेघर टोल नाक्यावर महाबळेश्वर कडे येणाऱ्या वहानांची टोल वसुली बंद; मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे आदेश.....
नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांच्या प्रयत्नांना यश.....
महाबळेश्वर : प्रतिनिधी
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांची पाचगणी दांडेघर टोल नाक्यावर होणारी आर्थिक लूट आणि त्यामुळे होणारे वाद लक्षात घेऊन, हा टोल तातडीने बंद करण्याचे आदेश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे महाबळेश्वरला जाणाऱ्या लाखो पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला असून, पर्यटन व्यवसायालाही गती मिळणार आहे.
पाचगणी येथील दांडेघर टोल नाक्यावर महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांकडून टोल वसुली केली जात होती. यामुळे पर्यटकांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. अनेकदा टोल मागण्यावरून पर्यटक आणि नाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र वादविवाद होत होते. या सततच्या त्रासामुळे महाबळेश्वरच्या पर्यटनावर अत्यंत वाईट परिणाम होत होता.
पर्यटनाला बसणारा फटका आणि पर्यटकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे ठरवले. त्यांनी 'हॉटेल रेन फॉरेस्ट' येथे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेतली. दांडेकर नाक्यावरील हा अन्यायकारक टोल रद्द करण्यात यावा, अशी आग्रही मागणी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी केली.
नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी मांडलेली समस्या आणि पर्यटकांची होणारी कोंडी लक्षात घेऊन मंत्री श्री. पाटील यांनी तातडीने पावले उचलली. त्यांनी पाचगणीचे नगराध्यक्ष दिलीप बगाडे आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांसोबत तात्काळ एक बैठक घेतली.
महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पर्यटकांकडून दांडेकर टोल नाक्यावर यापुढे कोणत्याही प्रकारचा टोल घेण्यात येऊ नये. पर्यटकांच्या माहितीसाठी आणि सुलभतेसाठी टोल नाक्याच्या परिसरात तशा आशयाचे स्पष्ट फलक तातडीने लावण्यात आले आहेत
मंत्री श्री. पाटील यांच्या या धडक निर्णयामुळे दांडेघर टोल नाक्यावरील वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महाबळेश्वर पालिकेचे नगराध्यक्ष सुनील शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल पर्यटकांकडून आणि स्थानिक व्यावसायिकांकडून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485



Social Plugin