आंबेनळी घाटात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कोरेगावचे ८ तरुण १ हजार फूट दरीत कोसळून ठार
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील मुख्य आंबेनळी घाटात दाभिळ टोक परिसरात रविवारी रात्री उशिरा एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील आठ तरुणांची 'स्कॉर्पिओ' कार सुमारे १ हजार फूट खोल दरीत कोसळली. या भयानक अपघातात कारमधील सर्वच्या सर्व ८ तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. वीकेंडला कोकणात पर्यटनाचा आनंद घेऊन परतत असताना या तरुणांवर काळाने घाला घातला.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दरीत
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुण हे सातारा जिल्ह्यातील आसगाव (ता. कोरेगाव) येथील रहिवासी होते. हे सर्वजण स्कॉर्पिओ कार (क्र. MH 11 DN 2340) मधून कोकणात पर्यटनासाठी गेले होते. रविवारी रात्री उशिरा कोकणातून महाबळेश्वरमार्गे साताऱ्याकडे परतत असताना, आंबेनळी घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट १ हजार फूट खोल दरीत कोसळली. दरी अत्यंत खोल असल्याने कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.
मृतांची नावे समोर
या अपघातातील सर्व ८ मृतांची नावे समोर आली असून, यामध्ये कोरेगाव परिसरातील तरुण आणि जबाबदार व्यक्तींचा समावेश असल्याने आसगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.
मृतांची नावे खालीलप्रमाणे:
१. महेश अनिल पवार (वय २५)
२. आदित्य अशोक साळुंखे (वय २१)
३. रितेश राजेंद्र लोखंडे (वय २५)
४. सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०)
५. अंश समीर चव्हाण (वय १८)
६. उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २१)
७. अनिल अभिमन्यू शिंगटे (वय ३५)
८. नितीन किसन नायकोंडे (वय ३५)
बचावकार्यासाठी प्रशासन व विविध ट्रेकर्सची मोठी कसरत
अपघातग्रस्त स्कॉर्पिओ कार घाटातील अत्यंत दुर्गम आणि खोल भागात असल्याने मृतदेह आणि गाडी बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. रविवारी रात्री अपघात झाल्याचे समजताच स्थानिक प्रशासन, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
रात्रीच्या अंधारात आणि प्रतिकूल परिस्थितीतही मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. सोमवारी सकाळीही शोध आणि बचाव पथकांकडून विशेष तांत्रिक उपकरणांचा वापर करून मृतदेह दरीतून वर काढण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी स्थानिक पोलीस, महसूल प्रशासनाचे अधिकारी, तसेच मृतांचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.



Social Plugin