नसरापूर येथील घटनेचा महाबळेश्वर शिवसेनेतर्फे तीव्र निषेध; आरोपीला फाशी देण्याची मागणी.....
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेली घटना अतिशय संतापजनक आणि मानवतेला काळीमा फासणारी आहे. या अमानुष कृत्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित नराधमावर कठोरात कठोर कारवाई करून त्याला तातडीने फाशी द्यावी, या मागणीसाठी शिवसेना महाबळेश्वर शहराच्या वतीने महाबळेश्वर पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
यावेळी शहर प्रमुख विजुभाऊ नायडू, शहर संघटक सुनील ढेबे, तालुकाप्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राजूभाऊ पंडित, महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ. मेघा चोरगे यांच्यासह मंगल फळणे, सोनाली बांदल, शितल वाईकर, सचिन जेधे, सचिन गुजर, गोविंद कदम, राहुल साळुंखे, सचिन ओतारी व इतर शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या घटनेतील गांभीर्य लक्षात घेता प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक न्यायालयात करण्यात यावी. पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया वेगवान करून नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
अशा घटनांमुळे समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. या नराधमाला कठोर शिक्षा मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी असा इशारा महाबळेश्वर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485



Social Plugin