महाबळेश्वर शहरातील विविध नागरी समस्यांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवेदन. महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरातील विविध नागरी समस्यांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शहर शाखेच्या वतीने महाबळेश्वर नगरपरिषदेचे मुख्य लिपिक श्री. बबनराव जाधव यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत :
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकाजवळील नगरपरिषदेचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज वाहनतळ हे खाजगी भाडे तत्त्वावर न देता नगरपरिषदेमार्फतच चालविण्यात यावे तसेच स्थानिक युवकांना रोजगारामध्ये प्राधान्य द्यावे.
महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, वेण्णा लेक नाका, महाड नाका आणि सातारा नाका येथे सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा विषय सर्वसाधारण सभेत घेण्यात यावा.
विल्सन पॉईंट येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाक्यांची पावसाळ्यापूर्वी तसेच पावसाळा सुरू झाल्यानंतर नियमित स्वच्छता करण्यात यावी.
फॉरेस्ट ऑफिस ते भारत हॉटेल दरम्यान सुरू असलेल्या उत्खननामुळे रस्त्यावर चिखल साचत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात.
एल.सी. डिसोझा मार्गावर भरविण्यात येणाऱ्या स्थानिक मंगळवार आठवडे बाजार परिसरातील नगरपरिषदेची प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावीत, जेणेकरून महिला व नागरिकांना पावसाळ्यात कोणताही त्रास सहन करावा लागू नये.
यावेळी शहरप्रमुख राजाभाऊ गुजर, युवासेना पदाधिकारी आकाश साळुंखे, उपशहरप्रमुख राजेश साळवी, शाहनवाज खरखंडे, सुशांत (आबा) पारठे, आरोग्य सेनेचे अमोल साळुंखे, अली वारुणकर, समीर तांबोळी, ज्येष्ठ नागरिक अशोक (मामा) शिंदे, तेजस बोधले आदी उपस्थित होते.
शहरातील नागरिकांच्या दैनंदिन समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


Social Plugin