Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरच्या ऐतिहासिक हेरिटेज ग्रेड-१ गोल्फ कोर्सवर पर्यावरणाचा घात; प्रांताधिकाऱ्यांच्या पाहणीत धक्कादायक प्रकार उघड.....

 महाबळेश्वरच्या ऐतिहासिक हेरिटेज ग्रेड-१ गोल्फ कोर्सवर पर्यावरणाचा घात; प्रांताधिकाऱ्यांच्या पाहणीत धक्कादायक प्रकार उघड.....



महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर : प्रतिनिधी

केंद्रीय पर्यावरण संवेदनशील क्षेत्र  म्हणून घोषित असलेल्या महाबळेश्वर येथील ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा लाभलेल्या हेरिटेज ग्रेड-१ गोल्फ कोर्स परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परवानगीचा गैरवापर करून वृक्षतोड, बेकायदेशीर रस्तेनिर्मिती, जमिनीचे खोदकाम आणि अनधिकृत शेड उभारल्याचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्या प्रत्यक्ष पाहणीत उघड झाले असून, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

 द क्लब महाबळेश्वरचे सचिव लेफ्टनंट कर्नल गौतम नंदी यांनी गोल्फ कोर्स मैदानाचे सपाटीकरण करून गवत लागवडीसाठी तहसीलदार कार्यालयाकडून २० फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृत परवानगी घेतली होती. मात्र, या परवानगीच्या चौकटीबाहेर जाऊन सिटी सर्व्हे क्रमांक ११७ व ११८ मधील या क्षेत्रात जेसीबी मशीनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर खोदकाम करण्यात आले.


​वनसदृश्य परिसरातील अंजन, जांभुळ,पिसाळ,बोबडसा,कावळा, गेळा अशा विविध हजारो संख्येने वृक्षतोड करून जमिनीखाली गाडण्यात आल्याचे समोर आले आहे. जेसीबीच्या सहाय्याने मातीचे मोठमोठे ढिगारे व कृत्रिम टेकड्या निर्माण करून अंतर्गत रस्ते तयार करण्यात आले.

​ वृक्षतोड केलेल्या जागेवर विनापरवाना मोठ्या आकाराचे पत्र्याचे शेड उभारण्यात आले असून, संपूर्ण गोल्फ कोर्सच्या चारही बाजूंना तारांचे कुंपण घालण्यात आले आहे.

​या गंभीर प्रकाराबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे  यांनी तातडीने संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी महाबळेश्वर नगरपालिकेचे वृक्ष अधिकारी हिवरे आणि तहसीलदार सचिन मस्के यांच्याकडे परवानगीच्या अटींबाबत विचारणा केली. त्यावर, परवानगी व्यतिरिक्त इतर कामे सुरू असल्याची माहिती प्रशासनाला नाही,असे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.

​यावर संतप्त झालेल्या प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावत, झालेल्या प्रकाराचा तात्काळ पंचनामा करण्याचे निर्देश दिले. तसेच काम तातडीने बंद पाडून, अटींचा भंग झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा  दाखल करण्याचे तोंडी आदेश दिले आहेत.



​या संयुक्त पाहणी प्रसंगी तहसीलदार सचिन मस्के, मुख्याधिकारी योगेश पाटील, तक्रारदार तथा बॉम्बे एन्व्हायरमेंट ॲक्शन ग्रुपचे चेअरमन अनिल पंडित, सूर्यकांत पांचाळ, वृक्ष अधिकारी हिवरे, सागर शिंदे, वन कर्मचारी लहू राऊत, सुनील लांडगे, मुख्य लिपिक बबन जाधव, अमित माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र असंतोष

महाबळेश्वरसारख्या जागतिक स्तरावर ओळख असलेल्या पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्रातील हेरिटेज ग्रेड-१ दर्जाच्या जागेवर झालेल्या या विकासकामांमुळे पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आता प्रशासकीय पंचनामा आणि होणाऱ्या संभाव्य फौजदारी कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


       बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                 संपादक :- राहुल शेलार 

                    📱 9765576377

        कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                   📱 9403546 485