शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करा; हलगर्जीपणा खपवून घेणार नाही – उपनगराध्यक्ष पाणी पुरवठा सभापती नासीर भाई मुलाणी.....
मोटार लावून पाणी खेचणाऱ्यांवर होणार कडक कारवाई; पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांच्या बैठकीत कडक निर्देश
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
शहरातील पाणी पुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी उपनगराध्यक्ष व पाणी पुरवठा समितीचे सभापती नासीर भाई मुलाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणी पुरवठा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शहराच्या पाणी प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रत्येक झोनमधील कर्मचाऱ्यांना अलर्ट' राहण्याचे आदेश
सभापती नासीर भाई मुलाणी यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कान टोचले.
शहरातील पाणी पुरवठा आता पूर्णपणे सुरळीत करण्यात आला असून, प्रत्येक झोन वाईज नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या पाणी पुरवठ्याबाबतच्या तक्रारी व समस्या सोडवण्यासाठी २४ तास सतर्क राहावे, अशा कडक सूचना त्यांनी दिल्या.
शहरातील काही भागांमध्ये नागरिक थेट नळाला बेकायदेशीरपणे मोटार लावून पाणी खेचत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे इतर नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळते. अशा पाणी चोरांवर आणि नियम मोडणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश सभापतींनी प्रशासनाला दिले आहेत.
सार्वजनिक विहिरी आणि बोअरवेल्स होणार दुरुस्त
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शहरातील सर्व सार्वजनिक विहिरी आणि बोअरवेल्स तातडीने स्वच्छ करून व दुरुस्त करून वापरात आणल्या जातील, जेणेकरून नागरिकांना पर्यायी पाण्याचा स्रोत उपलब्ध होईल.
सध्या प्राधिकरण जी पाणी योजना चालवते, ती पूर्णपणे नगरपालिका आपल्या अधिकारात का चालवणार नाही? यासाठी मी स्वतः वैयक्तिक पातळीवर विशेष प्रयत्न करत आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत ही योजना नगरपालिकेकडे पूर्णपणे हस्तांतरित करून घेतली जाईल.
– नासीर भाई मुलाणी (उपनगराध्यक्ष व पाणी पुरवठा सभापती)
या महत्त्वपूर्ण बैठकीला पाणी पुरवठा अभियंता प्रदीप कुमार बोरगे यांच्यासह कर्मचारी रामदास शिंदे, अशोक जाधव, सचिन आरडे, बाळु मोहिते, गणेश बर्गे, धनंजय ढेबे, अहमद कुरेशी, बबलू वाडकर आदी प्रमुख कर्मचारी व तंत्रज्ञ उपस्थित होते.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin