उद्या पासून महाबळेश्वरचा ऐतिहासिक आठवडे बाजार छत्रपती संभाजी महाराज पार्किंगमध्ये होणार स्थलांतरित
वाहतूक कोंडीतून सुटका होणार; नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्याकडून नव्या जागेची पाहणी
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
महाबळेश्वर येथील एल. सी. डिसोजा रोडवर भरणारा ऐतिहासिक आठवडे बाजार आता पालिकेच्या छत्रपती संभाजी महाराज पार्किंगच्या जागेत स्थलांतरित करण्यात येणार आहे. या नियोजित नवीन जागेची नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील आणि स्थानिक नगरसेवकांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. बाजार स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसर तातडीने स्वच्छ करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
महाबळेश्वरमधील एल. सी. डिसोजा रोडवर आठवडे बाजारामुळे दरवेळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत होती. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालिकेने बाजार स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन जागेमुळे वाहन पार्किंग आणि बाजार एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
नवीन बाजार भरवण्यापूर्वी संपूर्ण परिसर तातडीने चकाचक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बाजारातील व्यापाऱ्यांना शिस्तबद्ध पद्धतीने जागा नेमून दिली जाईल, जेणेकरून तिथे गोंधळ उडणार नाही.
बाजारात येणाऱ्या नागरिकांसाठी व पर्यटकांसाठी पिण्याचे पाणी आणि कचरा व्यवस्थापनाची चोख व्यवस्था केली जाईल.
या पाहणी दौऱ्यात शहरातील प्रमुख नगरसेवक, पालिका अधिकारी आणि व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. जागेची स्वच्छता आणि प्राथमिक नियोजन पूर्ण होताच हा बाजार नव्या जागेत अधिकृतपणे सुरू होईल, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.


Social Plugin