AIBE २१ परीक्षा उत्तीर्ण होत असिफ नालबंद बनले वकील; मुंबई उच्च न्यायालयात सनद प्राप्त
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक कष्टाच्या जोरावर मिळवलेले यश हे कायमच प्रेरणादायी असते. असाच एक कौतुकास्पद आणि अभिमानास्पद टप्पा असिफ नालबंद यांनी गाठला आहे. ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (AIBE XXI) ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होत त्यांनी ‘अॅडव्होकेट’ (Adv. Asif Nalband) म्हणून अधिकृतपणे मुंबई उच्च न्यायालयात आपली सनद मिळवली आहे.
AIBE ही संपूर्ण भारतात वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी केंद्र सरकार आणि बार कौन्सिलतर्फे अनिवार्य मानली जाणारी परीक्षा आहे. ही कठीण परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करत उत्तीर्ण झाल्यामुळे असिफ नालबंद यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आपल्या या यशामगे कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे सांगताना अॅड. असिफ नालबंद भावनिक झाले. त्यांनी सांगितले, हा विजय केवळ माझा नसून माझ्या आईने घेतलेले अपार कष्ट, तिचा त्याग आणि माझ्यावर दाखवलेला विश्वास यांचा आहे. तसेच संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर माझ्या पत्नीने दिलेली निःस्वार्थ साथ आणि सहकार्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती, गुरुजन आणि मित्रांच्या आशीर्वादाने हा प्रवास पूर्ण झाला आहे.
वकील केवळ एक ओळख नसून ती एक मोठी सामाजिक जबाबदारी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आपल्या गावातील आणि परिसरातील अनेक तरुण-तरुणींनी कायद्याच्या क्षेत्रात पुढे यावे, मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करावीत, यासाठी त्यांना मार्गदर्शन आणि मदत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
"संघर्ष जेवढा मोठा असेल, तेवढेच यशाचे मोल अधिक असते," असा संदेश देत त्यांनी तरुणांना प्रामाणिक मेहनत आणि जिद्दीच्या बळावर पुढे जाण्याचे आवाहन केले आहे. अॅड. असिफ नालबंद यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin