रोटरी व इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वरचा संयुक्तिक पदग्रहण सोहळा उत्साहात
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर (प्रतिनिधी)
सेवा कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब व इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वरचा २०२६-२०२७ या कार्यकाळाचा संयुक्तिक पदग्रहण सोहळा नुकताच ब्राइट रिसॉर्ट येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला पुण्याचे प्रसिद्ध समाजसेवक व सोहम ट्रस्टचे डॉ. अजित सोनावणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या सोहळ्यात रोटरी क्लबच्या नूतन अध्यक्षपदी महेश कोमटी व सचिवपदी डॉ. आशिष चोपडे, तर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी सौ. सुलक्ष्मी येरलगड्डा व सचिवपदी सुप्रिया बागुल यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली.
इतरांसाठी जगण्यातच खरी सार्थकतेची भावना – डॉ. अजित सोनावणे
प्रमुख पाहुणे डॉ. अजित सोनावणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ''जी माणसं स्वतः चा विचार करत रात्रभर जागे असताना त्यांच्या जगण्याला म्हणायचं जागरण परंतु जी माणसं दुसऱ्याचा विचार करत जागे राहतात त्यांच्या जगण्याला म्हणायचं जागर''
बाबा आमटे आणि सिंधुताई सपकाळ यांच्यासारख्या महान व्यक्तींचा आदर्श घेत आमची वाटचाल सुरू झाली असून समाजाने दिलेली ‘भिकाऱ्यांचा डॉक्टर’ ही पदवी आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. ज्या उंचीचा उपयोग समाजातील गरजवंतांसाठी होत नाही, तिचा काहीच उपयोग नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. रोटरी व इनरव्हील क्लब राबवत असलेल्या लोकउपयोगी प्रकल्पांचे कौतुक करत, लहानपणी शिक्षणात आलेल्या अडचणींनंतर संत गाडगेबाबा, बाबा आमटे आणि सिंधुताई सपकाळ यांच्या विचारांनी आपल्या आयुष्याला कशी नवी दिशा दिली, याबद्दल त्यांनी अनुभव कथन केले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व इनरव्हील प्रार्थनेने झाली. दीपप्रज्वलनानंतर दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थी, भारतीय सैन्यात दाखल झालेले विजय संतोष तोडकर, तसेच कृष्णा प्रमोद पवार व डॉ. मोनाली शिर्के यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष महेश कोमटी यांनी आगामी वर्षात पर्यावरण, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन क्षेत्रात विविध लोकउपयोगी प्रकल्प राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच महाबळेश्वरमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांसाठी 'रोटरी सन्मान सोहळ्या'चे आयोजन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
इनरव्हील क्लबच्या नूतन अध्यक्षा सौ. सुलक्ष्मी येरलगड्डा यांनी आपल्या कार्यकाळात अधिकाधिक सेवा प्रकल्प राबवून समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचण्याचा मानस व्यक्त करत नूतन कार्यकारी मंडळाची घोषणा केली.
मावळते रोटरी अध्यक्ष विजय काळे व इनरव्हील मावळत्या अध्यक्षा वर्षा पार्टे यांनी आपापल्या कार्यकाळातील अहवाल सादर केला व सर्वांचे आभार मानले.
या सोहळ्यास असि. गव्हर्नर डॉ. मनोहर दातार, नगराध्यक्ष सुनील शिंदे, पीडीसी रोहिणी वैद्य, दिव्यांग उद्योजक डॉ. भावेश भाटिया, नगरसेवक रोहित ढेबे, ॲड. संजय जंगम, रवींद्र कुंभारदरे, नगरसेविका विमलताई पार्टे, पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश पल्लोड, उपअभियंता अजय देशपांडे, माजी नगराध्यक्ष बबनराव ढेबे, आणि इनरव्हील आयएसओ स्वाती बिरामणे यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश कोरे, दिनेश भिसे, डॉ. मोनाली शिर्के, वैशाली चौरसिया व अश्विनी कोमटी यांनी केले. सोहळा यशस्वी करण्यासाठी रोटरी व इनरव्हीलच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin