महाबळेश्वरमध्ये वृक्षतोडीचा धडाका महसूल प्रशासन झोपेत का...?
मौजे नाकींदा परिसरात निसर्गाची कत्तल ; स्थानिक अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप.....!
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर (प्रतिनिधी):
निसर्गाचे वरदान लाभलेल्या आणि पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये वृक्षतोडीचे सत्र थांब नाव घेताना दिसत नाही. महाबळेश्वरजवळील मौजे नाकींदा येथील मुख्य रस्त्यालगत असलेल्या सर्व्हे क्रमांक २२ मधील खाजगी मिळकतीत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून जमीन खुली करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर घटनेमुळे महाबळेश्वरच्या निसर्गप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, या गैरप्रकाराला स्थानिक महसूल प्रशासनाचे अभय असल्याचा थेट आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या या मिळकतीत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षतोड करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, केवळ झाडे तोडूनच हा प्रकार थांबला नाही, तर याचे पुरावे नष्ट करण्यासाठी तोडलेली झाडे आजूबाजूच्या जंगल परिसरात फेकून देण्यात आली आहेत. विकासकामाच्या नावाखाली वनराई नष्ट करून जमीन खुली करण्याचा हा राजरोस सुरू असलेला प्रकार सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पांचाळ, शिवसेना (उ.बा ठा) शहरप्रमुख राजाभाऊ गुजर, आकाश साळुंखे, राकेश देवकुळे आणि राजेश सोंडकर यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन उघडकीस आणला आहे.
पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने केंद्र सरकारने आति संवेदनशील घोषित केलेल्या महाबळेश्वर तालुक्यात सातत्याने वृक्षतोड व उत्खनन करून पर्यावरणाचा अतोनात नुकसान करून धनदांडग्याची काही प्रकरणे उघडकीस आले आहे. त्यामध्ये किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी मौजे कुंभरोशी हद्दीतील मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने दाट वनसदृश्य असलेली सर्व्हे नंबर २५ व २६ या मिळकती मध्ये २० ते २५ एकर क्षेत्रावर वृक्षराई नष्ट करून मोठ्या प्रमाणात निसर्ग पर्यावरणाचे नुकसान करण्यात आले आहे. तसेच मौजे मेटतळे येथील सर्व्हे नंबर ११ मधील पोट हिस्सात जमिन सपाटीकरणासाठी उत्खनन परवानगी घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्षराई चे तोड करुन नुकसान करण्यात आले आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच गोल्फ कोर्स हेरिटेज मिळकतीतील वृक्षतोडीचे प्रकरण ताजे असताना, आता नाकींदा परिसरात घडलेला हा नवा प्रकार महसूल प्रशासनाच्या कामकाजावर आणि हेतूवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. भर रस्त्यालगत इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असताना नाकींदा गावचे तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना (सर्कल ऑफिसर) हा प्रकार कसा काय दिसला नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय आणि संगनमताशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर निसर्गाची कत्तल होणे अशक्य असल्याची खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
कठोर कारवाईची मागणी
या संपूर्ण गंभीर प्रकरणाची दखल घेत सामाजिक कार्यकर्त्यांनी साताराच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, संबंधित मिळकतीमध्ये सुरू असलेल्या तथाकथित विकासकामांना तात्काळ 'स्टे' (मनाई आदेश) देण्यात यावा. नियमबाह्य आणि बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या संबंधित मिळकतधारकावर कठोर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
अधिकाऱ्यांवर कारवाई : सामाजिक कार्यकर्तत्या कडून तक्रार दाखल झाल्या नंतर आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि या गंभीर गैरप्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित तलाठी व मंडल अधिकाऱ्यांवर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
महाबळेश्वरचे पर्यावरण धोक्यात आणणाऱ्या या प्रकारामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता सातारा जिल्हा प्रशासन यावर कोणती भूमिका घेते आणि निसर्गाची कत्तल करणाऱ्या दोषींवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485



Social Plugin