Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरच्या विकासाचा नवा अध्याय! नवीन प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा

 महाबळेश्वरच्या विकासाचा नवा अध्याय! नवीन प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा

लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे, नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश; शाळांच्या इमारतींना धक्का न लावता 'टाऊन प्लॅनिंग'कडून सुधारित आराखड्याला मंजुरी




महाबळेश्वर टाईम्स 

​महाबळेश्वर | प्रतिनिधी

महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. नगररचना विभागाने (टाऊन प्लॅनिंग) या प्रकल्पाच्या सुधारित आराखड्याला मंजुरी दिल्याने शहराच्या विकासाला नवे बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे, संबंधित भूखंडावरील शाळांच्या ऐतिहासिक व शैक्षणिक वारसा असलेल्या इमारती कायम ठेवत, नवीन प्रशासकीय इमारतीस परवानगी मिळाल्याने विकास आणि शैक्षणिक हित यांचा सुवर्णमध्य साधण्यात नगरपरिषदेला यश आले आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आव्हानांवर महाबळेश्वर नगरपरिषदेने कायदेशीर लढा दिला. न्यायालयाने नगरपरिषदेची भूमिका ग्राह्य धरत सर्व अडथळे दूर केल्यानंतर, लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे, सर्व नगरसेवक तसेच मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी प्रकरणाचा पाठपुरावा अधिक वेगाने सुरू ठेवला. त्यानंतर तज्ज्ञांच्या माध्यमातून सुधारित 'मास्टर प्लॅन' तयार करून तो नगररचना विभागाकडे सादर करण्यात आला होता. या प्लॅनला मंजुरी मिळाल्याने विकासकामांना विरोध करणाऱ्यांना चपराक बसल्याची चर्चा शहरात आहे.

शैक्षणिक वारसा जपत विकासाचे आव्हान फत्ते


सदर भूखंडातील शाळांच्या विद्यमान इमारती न पाडता नवीन प्रशासकीय इमारतीचे नियोजन करणे हे एक मोठे आव्हान होते. नगराध्यक्ष सुनील शिंदे, नगरसेवक आणि मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी हे आव्हान स्वीकारून तांत्रिक व कायदेशीर बाबींची पूर्तता केली. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांवर कोणताही परिणाम न होता शहराला आधुनिक प्रशासकीय इमारत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा निर्णय विकास आणि जनहित या दोन्ही बाबींचा समतोल राखणारा ठरला आहे.

'एक शहर – एक प्रशासन' संकल्पना होणार प्रत्यक्षात


प्रस्तावित प्रशासकीय संकुलात विविध शासकीय कार्यालये एकाच छताखाली कार्यरत होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना शासकीय कामांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागणार नाहीत. एक शहर  एक प्रशासन ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांनी न्यायालयीन प्रक्रिया, तांत्रिक मंजुरी आणि प्रशासकीय स्तरावरील सर्व अडथळे दूर करण्यासाठी घेतलेल्या कष्टांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या निर्णयामुळे महाबळेश्वरचे व्यापारी, नागरिक आणि विविध सामाजिक घटकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, शहराच्या वैभवात भर पडणारी आधुनिक इमारत लवकरच उभी राहणार आहे.

ठळक वैशिष्ट्ये 

न्यायालयीन अडथळे दूर : नगरपरिषदेच्या कायदेशीर लढ्याला यश.

​सुधारित आराखड्यास मंजुरी : नगररचना विभागाकडून  हिरवा कंदील.

​शैक्षणिक हिताचे जतन: शाळांच्या विद्यमान इमारती कायम ठेवून नवीन प्रकल्पाची परवानगी.

​सर्व सेवा एकाच छताखाली: नागरिकांची वेगवेगळ्या कार्यालयांत होणारी पायपीट थांबणार.

​नेतृत्वाला यश : लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे, नगरसेवक व मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या पाठपुराव्याचे फलित.


सदैव महाबळेश्वरचा विकास हाच ध्यास या भूमिकेतून लोकप्रतिनिधींनी केलेल्या या प्रयत्नांमुळे महाबळेश्वरच्या विकासाच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे, अशी भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

       

बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                 संपादक :- राहुल शेलार 

                     📱 9765576377

        कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                     📱 9403546 485