अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरकरांना सतर्कतेचे आवाहन
पालिका प्रशासन २४ तास सज्ज; आपत्कालीन परिस्थितीत तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन
महाबळेश्वर | प्रतिनिधी
महाबळेश्वर आणि परिसरात सध्या मुसळधार पावसाचा जोर कायम असून अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील आणि स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांसह पर्यटकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मुसळधार पावसामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ पालिका प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महाबळेश्वर नगरपरिषदेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन संपर्क क्रमांक : महाबळेश्वर नगरपरिषद कार्यालय : ०२१६८-२६०२२०
पालिका प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना
- अत्यावश्यक कामाशिवाय नागरिक व पर्यटकांनी घराबाहेर पडणे टाळावे.
- दरडी कोसळण्याची व झाडे पडण्याची शक्यता लक्षात घेऊन धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे.
- सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे.
- घरात पाणी शिरणे, रस्ता खचणे, झाड पडणे किंवा इतर कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास तात्काळ पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा.
महाबळेश्वर पालिका प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी २४ तास कार्यरत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


Social Plugin